जन्मठेपेच्या शिक्षेतून दोन महिला आरोपींची औरंगाबाद खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन महिला आरोपींची आज मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात सविस्तर माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील अडावद गावात दिनांक 19 मे 2016 रोजी जेव्हा आरोपींच्या अंगणात मयत व्यक्ती नामे गणेश खंबायत यांच्या लग्नानिमित्त संगीताचा कार्यक्रम सुरू असताना नाचण्याच्या कारणावरून आरोपी नवरा बायको यांच्यात वाद निर्माण झाला आणि ते भांडण करत आपल्या घरात गेले. त्यांच्या मागे सदर नवरा बायको मधील बायकोच्या आईने देखील घरात प्रवेश केला. त्यानंतर थोड्याच वेळात सदर घरातून दोघही महिला आरोपींनी “वाचवा वाचवा” अशा आरोळ्या दिल्या. सदर आरोळ्या ऐकून मयत गणेश खंबायत हा आरोपींची समजूत घालण्यासाठी घरात गेला आणि आरोपी तुकाराम खंबायत याची समजूत घालू लागला. त्यामुळे सदर गोष्टीचा राग येऊन तुकाराम याने मयत गणेश खंबायत याच्यावर चाकुने हल्ला करीत गंभीर जखमी केले आणि सदर घटनेत गणेश खंबायत याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर मयत गणेश खंबायत याचा भाऊ हिरालाल खंबायत याच्या फिर्यादीवरून आरोपीं विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे असे मांडण्यात आले की मुख्य आरोपी याच्या पत्नीचे परपुरूषाशी असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती मयत गणेश यास झाली होती. सदर बाब गणेश द्वारे इतरांना माहीत झाल्यास कुटुंबाची बदनामी होईल त्यामुळे आरोपींनी कटकारस्थान रचून गणेश यास आपल्या घरी बोलावून त्याचा खून केला. सदर खटल्यात आरोप सिद्ध झाल्यामुळे जळगाव सत्र न्यायालयाने आरोपी नवरा बायको आणि सदर बायकोची आई अशा तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे जळगाव सत्र न्यायालयाच्या सदरच्या निकालाविरुद्ध आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे धाव घेतली.

सदर प्रकरणात आरोपींतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर घटनेचा फिर्यादी हिरालाल तसेच प्रत्यक्षदर्शी किशोर यांची साक्ष आरोपींना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाही. सदर हिरालाल आणि किशोर यांची फिर्याद पुरवणी जबाब आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 164 खाली दिलेल्या जबाबात सुसंगता आढळून येत नाही. तसेच फिर्यादी हिरालाल याने आपल्या फिर्यादीत दोघेही महिला आरोपींना गोवण्यासाठी सुधारणा करीत पुरवणी जबाब दिला आहे. त्यामुळे दोघेही महिला आरोपींचा दोष हा माफक संशयापलीकडे सिद्ध होत नाही. सदर प्रकरणात कटकारस्थान रचल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही, तसेच सदर प्रकरणात फिर्यादी हे मयत गणेश खंबायत यांचे नातेवाईक असून घटनेच्या वेळी तटस्थ व्यक्ती हजर असून देखील सुद्धा सरकारी पक्षातर्फे त्यांना तपासण्यात आले नाहीत. सदर युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 5 डिसेंबर 2022 रोजी निर्णय राखून ठेवला होता आणि 2016 पासून अटकेत असलेल्या आरोपी महिलेची तात्काळ जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले होते.

सदर प्रकरणात आज निकाल देताना मा. न्यायमूर्ती आर जी अवचट आणि न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्या खंडपीठाने आरोपींचे युक्तिवाद मान्य करत स्पष्ट केले की, सदर प्रकरणात फिर्यादीची साक्ष आणि फिर्याद यात सुसंगता आढळून येत नाही. फिर्यादीने पुरवणी जबाब देतांना मूळ फिर्यादीत दुरुस्ती करून दोघेही महिला आरोपींना गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच फिर्यादी यांनी कबूल केले आहे की सदर महिला आरोपीच्या अनैतिक संबंधाबाबत त्यांना कुठलीही माहिती नव्हती किंवा मयत गणेश याने त्याबाबत त्यांना माहिती दिली होती. प्रकरणात कट कारस्थान रचल्याचा देखील कुठलाही पुरावा आढळून येत नाही. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने मुख्य आरोपीची शिक्षा कायम ठेवून दोघेही महिला आरोपींची सदर प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपींच्या बाजूने अँड. दीपेश पांडे यांनी युक्तिवाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here