पत्नीची हत्या करणा-या पतीला दहा वर्ष कारावास

नागपूर : स्वयंपाक करतांना मांसाहारी भाजी जाळल्यामुळे पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

सुरेश मधुकर शेंद्रे (36) असे आरोपीचे नाव असून तो नांदेड गोपालटोली ता. नागभीड येथील रहिवासी आहे. 20 जुलै 2017 रोजी सत्र न्यायालयाने आरोपीस हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप व पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेत  आरोपीची जन्मठेप रद्द करुन त्याला सुधारीत शिक्षा सुनावली व दंड कायम ठेवला आहे.

आरोपीने संतापाच्या भरात पत्नीला काठी मारली, मात्र हत्या करण्याचा त्याचा हेतू नव्हता. तो कृर पद्धतीने वागला नाही असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्या. रोहीत देव आणि उर्मीला जोशी यांनी हा निर्णय दिला. शेतमजूर असलेल्या आरोपीस मद्यपानाचे व्यसन होते. 3 सप्टेबर 2015 रोजी रात्री भाजी जाळल्याच्या कारणावरुन आरोपीने पत्नीला काठीने मारहाण केली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here