डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमाला, पर्यावरण अभ्यासक दिलीप जोशी यांचे रविवारी व्याख्यान – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

जळगाव दि. 22 (प्रतिनिधी) – ज्यांनी आयुष्यभर फक्त शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांचा ध्यास घेतला असे भूमिपुत्र,  ज्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा होता असे श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी शेतीमध्ये ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचे सुयोग्य प्रयोग करून जगभरातील कृषिक्षेत्राचे चित्र पालटून टाकले. त्यांच्या या कार्य-कर्तृत्वामुळे ते भारतातच नव्हे तर जगभर आठवणीत असतील.  

25 रोजी त्यांचा स्मृतीदिन असतो त्या औचित्याने रविवारी 26 फेब्रुवारी रोजी  दुपारी 3.15 वाजता कस्तुरबा सभागृहात पर्यावरण कार्यकर्ता व अभ्यासक दिलीप जोशी हे ‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमालेचे  दुसरे पुष्प गुंफत आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या या उपक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अनिल जैन यांनी केले. 

आपल्या परिसरातील मर्यादित निसर्गाद्वारे उपलब्ध मोफत साधन सामुग्रीला ज्ञान व अत्याधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने समृद्धी आणणे शक्य आहे या विषयावर प्रकाशझोत टाकणारे, आशादायी मार्ग दाखविणारे पर्यावरण अभ्यासक व कार्यकर्ते तसेच एनआयडी पहिल्या बॅचचे पदवीधारक असलेले दिलीप जोशी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय पातळीवरील व्याख्यानमाला असल्याने हिंदी राष्ट्रभाषेतून व्याख्यान दिले जाणार आहे. या व्याख्यानाचा श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा व वेळेवर व्याख्यान स्थळी येण्याचे करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here