बारा हजाराची लाच – कोतवालासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : सुरुवातीला पंधरा हजार व तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच स्विकारणा-या खासगी इसमासह कोतवालास जळगाव एसीबी पथकाने अटक केली आहे. सात बारा उता-यावर स्वत:चे नाव लावण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. रविंद्र लक्ष्मण धांडे असे भुसावळ तहसील कार्यालयात नेमणूकीला असलेल्या कोतवालाचे नाव आहे. तसेच हरिष देविदास ससाणे (रा.आंबेडकर नगर भुसावळ) असे कोतवालासाठी लाच स्विकारणा-या खासगी इसमाचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदाराने सन 2022 मधे भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे गावात स्वत:च्या नावे शेतजमीन विकत घेतली आहे. या शेतजमीनीच्या सात बारा उता-यावर तक्रारदारास स्वत:चे नाव लावायचे होते. याकामी त्यांनी तलाठी कार्यालय भुसावळ येथे प्रकरण सादर केले होते. भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी या प्रकरणात  त्रुटी काढून तक्रारदारास कोतवाल रविंद्र धांडे यांना  भेटण्यास  सांगितले  होते . त्यानुसार तक्रारदाराने कोतवाल रवींद्र  धांडे  यांची भेट घेतली होती.

मी तुमचे सात बारा उता-यावर मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्याकडून नाव लावून आणून देतो, मात्र त्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच द्यावी लागेल असे कोतवाल रविंद्र धांडे यांनी तक्रारदाराला म्हटले. तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच खासगी इसम हरिष ससाने यांच्याकडे देण्याचे ठरले. कोतवालाच्या सांगण्यानुसार खासगी इसमाने लाच स्विकारताच एसीबी पथकाने दोघांना ताब्यात घेत पुढील कारवाई केली. दोघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल पाटील पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here