जैन इरिगेशनचा सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिटयूट सोबत एसटीजी तंत्र प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

जळगाव, २६ एप्रिल २०२३ (प्रतिनिधी):- जळगाव येथील सुप्रसिद्ध सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि कंपनीने आयसीएआरच्या सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टीट्यूट (नागपूर) बरोबर सामंजस्य करार केला. या करारानुसार कंपनीच्या सहकाऱ्यांना रोगमुक्त स्वीट ऑरेंज आणि इतर लिंबूवर्गीय फळे-मँडॅरीन, लिंबू आणि ग्रेफफ्रुट यांच्या रोपांच्या निर्मितीसाठी आवश्यक असे शूट टिप ग्राफ्टींग (एसटीजी) तंत्रज्ञान शिकविणे, त्यासंबंधी सल्ला-सेवा देवाण-घेवाण होणार आहे. विकसीत या तंत्रज्ञानामुळे सिट्रस ग्रीनिंग, ट्रीस्टझा, मोझेक आणि रिंग स्पॉट व्हायरस यासारख्या विषाणूंच्या आणि सूक्ष्म विषाणूंच्या रोगांपासून मातृवृक्ष (मदर ट्री) मुक्त असतात. 

हे तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारचे ऊतीसंवर्धन तंत्र आहे. या तंत्रामध्ये रूटस्टॉक हे मातीमुक्त माध्यमात वाढवले जातात. त्याच्यावर अपिकल मेरीस्टेम ग्रंथींचे डोळे कलम केले जातात. यासाठी अपिकल ग्रंथींचा एक छोटासा भाग (०.१ ते०.२ एमएम) जो विषाणूमुक्त असतो त्यांचे रूटस्टॉक वर कलम केले जाते. यापासून तयार केलेले मातृवृक्ष हे बडस्टीक लावून पुनरुत्पादन केले जातात. असे मातृवृक्ष कोणताही रोग झालेला नाही अशी तपासणी केली जाते. शास्त्रज्ञ डॉ. एन. विजया कुमारी यांनी हे तंत्रज्ञान सीसीआरआयमध्ये विकसित केले असून या सामंजस्य करारावर त्यांनी स्वाक्षरी केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे डॉ. अनिल ढाके यांनी स्वाक्षरी केली. यावेळी डॉ. बी. के. यादव, सीसीआरआयचे माजी संचालक डॉ. एम. एस. लदानिया व अन्य तज्ज्ञ उपस्थित होते. 

मातृवृक्षाचे तत्वे व सातत्य असलेल्या जातींमध्ये वरील भाग हा लिंबूवर्गीय फळांचा भाग कलम केलेल्या रोपांंना दर्जेदार फळांचे उच्च उत्पादन करण्यासाठी सर्व प्रकारच्या रोगकारक जंतूंपासून मुक्त असला पाहिजे. हरितगृहात जैन टिश्यूकल्चर पार्कमध्ये जेएसओ १ ते ५ ह्या जैन स्वीट ऑरेंजच्या रोपांचे रोगमुक्त उत्पादन केले जाते. मातृवृक्ष संवेदनशील वातावरणात हरितगृहात ठेवले जातात आणि रोग-किडीचा उपद्रव टाळता येतो.  मातीमुळे रोग-कीडी उद्भवू शकतात त्यामुळे ही रोपे माती विरहीत मीडियात रोगमुक्त वाढवली जातात. 

ह्या एसटीजी तंत्रामुळे रोगमुक्त रोपांची निर्मिती करता येते कारण नवीन प्रजाती किंवा आयात केलेल्या प्रजाती रोपे स्वच्छ करता येतात. एवढेच नव्हे तर एखाद्या रोपाला चांगली दर्जेदार फळे येतात. पण ते रोगयुक्त असेल तर त्यालासुद्धा स्वच्छ करता येते. त्यानंतर ते मातृवृक्ष म्हणून काम करु शकते. हा दोन संस्थांचा सामंजस्य करार (एमओयु) संपूर्ण भारतभर निरोगी संत्राच्या आणि मँडारीनच्या फळबागा उभारण्यासाठी पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) मजबूत करायला एक पाऊल पुढे पडले असल्याचे निदर्शनास येते. 

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव आणि सीसीआरआयचे माजी संचालक डॉ. एम. एस. लदानिया यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या. सीसीआरआय तर्फे संचालक डॉ. डी. के. घोष आणि डॉ. एन. विजयकुमारी, डॉ. ए. के. दास यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सीसीआरआयचे सगळे शास्त्रज्ञ आणि इतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. सीसीआरआयचे शास्त्रज्ञ जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या सहकाऱ्यांना ६ प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात येत्या १४ महिन्यात प्रशिक्षण देतील. संपूर्ण भारतात आत्तापर्यंत ६ लाखाहून अधिक जैन स्वीट ऑरेंजची लागवड ३००० एकरहून अधिक शेतजमिनीत उच्च घनदाट (युएचडीपी) पद्धतीने झालेली आहे व हे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमिवर हा सामंजस्य करार ही जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ची उत्तम लिंबूवर्गीय फळांच्या देशातील प्रक्रिया उद्योगासाठी वचनबद्धता दर्शवितो. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here