लढाई “ठाकरे ब्रॅन्ड” वारशाची की “सरंजामशाही” संपवण्याची?

महाराष्ट्रात गाजलेला “ठाकरे ब्रँड” आमचाच असा दावा करत वारसा हक्काचा दावा करणारी लढाई एका वादग्रस्त जाहिरातीनंतर शिंदे विरुद्ध ठाकरे ऐवजी शिंदे विरुद्ध फडणवीस अशी बदलली आहे. या जाहिरातीची जखम महाराष्ट्र भाजपाला खोलवर घाव करुन गेल्याचे बोलले जाते. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले फडणवीस “विकास पुरुष” या भूमिकेतून औरंग्याच्या अवलादींना ठेचणारच म्हणून स्वतःचा हिंदुत्वाचा नवा मेकओव्हर करून पुढे येण्याच्या सुमारासच त्यांना बॅकफुटवर फेकणारा जाहिरात सर्व्हेचा झटका देण्यात आला. हे करतांना शिंदे यांनी मोदी यांचे आशिर्वाद केवळ आपल्यालाच असा देखावा मांडला.

राष्ट्रात केवळ मोदी ब्रॅंडच राहील असा उदो उदो करत एक प्रकारे सन 2029 पर्यंत कुणीही पंतप्रधानपदाचे स्वप्न बघू नये असा भाजपातल्या दोन नंबरवर असलेल्यांना ईशाराही दिला. जोडीला महाराष्ट्रात पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील, असे स्वतःचे अॅडव्हांस बुकिंग जाहीर करुन टाकले. आपल्या शक्तिशाली पंखाच्या छायेत ठाकरे यांचा हिंदुत्व ब्रॅन्ड बळकावणारा महाराष्ट्रात आणि देशात भाजपातल्या प्रस्थापितांना दणका देण्यास सिद्ध झाल्याचे पाहून मोदीजी नक्कीच सुखावले असणार. भाजपेतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी आणि विरोधकांचे कंबरडे मोडण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आहेच. स्वपक्षातल्या म्हणजे भाजपातील डोके वर काढू पाहणा-यांना शिंदे यांनी दिला तसा डोस द्यायला हवाच होता.

आता देशाला सन 2024 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदीजी आणि भाजपाची सत्ता हवीच म्हणून भाजपसह हिंदुत्ववादी संघशक्तीने आतापासून कामाला लागावे हा संदेश महत्त्वाचा. त्यासाठीच कोण किती लोकप्रिय हे पाहणे महत्त्वाचे. पण यातही गोम आहेच. कोणत्याही वोटर सर्वेक्षण एजन्सीला जो काम देतो ती एजन्सी काम आणि दाम देणा-याला “ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी” या म्हणीप्रमाणे झुकते माप देतेच.  समर्थ रामदास म्हणतात “आपुली आपण करी स्तुती तो एक मूर्ख. 100 कोटीच्या खोट्या आरोपात वर्षभर जेलमध्ये बसवलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी तर शिंदे यांनी स्वतःच्या सर्व्हेद्वारे स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार सांगितला. विश्लेषक अनेक प्रकारे पैलू उलगडतात. एकनाथ शिंदे यांच्यासाठी तिजोरीची दारे उघडून बसलेल्या महाशक्तीचा सत्तेचा नवा प्रयोग याच पद्धतीने सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात 350 ते 375 जागा आणि महाराष्ट्रात 47 जागांची टार्गेट गाठण्याच्या दिशेने आकारास यावा असे केंद्रास आता वाटते.

तथापी ही यशसिद्धी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने होईल की फडणवीसांच्या? हाच कळीचा मुद्दा बनला आहे. पक्ष नेतृत्वाची आरती, पंचारती, धुपारती घंटा बडवून करणे हा प्रकार सा-याच पक्षात चालतो. टीका झोंबे नाकाला अन स्तुती आवडे सर्वांना हा प्रकार सर्वपरिचीत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशा लाभार्थीं स्तुती पाठकांना  चमचा आणि चमचेगिरी म्हटले जाते. महाराष्ट्रापुरते पाहिले तर महाविकास आघाडीत एकटे उद्धव ठाकरे भावनिक आवाहनाद्वारे राजकीय हवा तापवतात आणि डायरेक्ट पंतप्रधान मोदींना आव्हाने देतात.  मोदी यांची कार्यपद्धती हुकूमशाहीकडे जाणारी असल्याची जाहीर टीका त्यांनी यापूर्वी अनेकवेळा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनाही मुस्लिमांच्या मशिदीत गेल्याबद्दल जाब विचारण्याची हिंमत त्यांनी दाखवली.

भाजपच्या हिंदुत्व लाइनवर अशाप्रकारे जाहीरपणे टोलेबाजी करण्याची हिम्मत महाराष्ट्रात तरी दुसऱ्या पिढीच्या कुण्या नेत्यात नाही. वाघासारख्या डरकाळ्या फोडणारे सत्तेच्या हिरव्या गवताचा चारा दाखवताच कसे मांजर बनतात हे लोक बघत आलेत. गुजरात मॉडेलची स्तुती करणारे राज ठाकरे लोकांनी पाहिले. दिल्लीच्या राजकारणात मोदीजी आणि शहा अशी दोन नेतेमंडळी अजिबात दिसता कामा नये असे म्हणणारे राज ठाकरे ईडीच्या पहिल्या तडाख्यानंतर कसे बदलले तेही महाराष्ट्राने पाहिले. सत्तेसाठी छोटेसे युद्धही मॅनेज केले जाऊ शकते असे म्हणणारे आणि सावध करणारेही राज ठाकरे. शिवाय भाजपच्या नादी लागू नका तो शिवसेना संपवणार असा इशारा देत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना टाळीसाठी मैत्रीचा हात पुढे करणारेही राज ठाकरेच. पण उद्धव यांनी त्यांची मैत्री तेव्हा झिडकारली. सत्तेसाठी तेव्हा त्यांना भाजपा जवळची वाटली. आज परिणाम समोर आहे.

राजकीय नेत्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवसेना यापुढे भाजपसोबत जाणार नाही, असे राजकीय विश्लेषक म्हणतात. शिंदे यांना किती काळ मुख्यमंत्रीपद दिले जाते ते दीड वर्षांत कळेलच. फडणवीस यांना केंद्रात घेऊन नितीन गडकरींना महाराष्ट्रात पाठवण्याची बातमी मधूनच झळकते. मोदीजींना पंतप्रधानपदाचा रांगेत कुणी स्पर्धक नसावा असे वाटते असे विश्लेषक सांगतात. ज्या मुद्यावर आरएसएस सध्या तरी गप्प आहे. मोदीजींच्या नेतृत्वाने देशाची सत्ता पुन्हा भाजपाकडे येत असेल तर चांगलेच असा विचार असावा. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 300 जागा जिंकेल आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे. राज्यात ठाकरे आणि शिवसेना ब्रॅन्डची खेचाखेची दिसत असली तरी भाजपसह बहुसंख्य बड्या पक्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात सक्षम धनदांडगे, जमीनदार, सरंजामदार तयार झाले आहेत. सत्तेच्या वळचणीला राहून काहींना घरच्या तिजो-या भरायच्या आहेत. काहींना त्यांचे प्रचंड भ्रष्टाचार, गुन्हेगारी, वर्तन, बदमाशी, पुन्हा सत्तेचे कुंपणरुपी संरक्षण हवे आहे. प्रत्येकाचा अजेंडा ठरलेला. बड्या राजकीय नेत्यांना मात्र पक्षातल्या सरंजामशाही चालवणारांना संपवण्याची, हिशेब चुकते करण्याची खेळी करायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखा कुणी लाभलाच तर त्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून फायर करण्याची संधी घेतली जाते. शिंदे असो की ठाकरे, देवेंद्र फडणवीस असो की राज ठाकरे ज्याची त्याची राजकीय अस्तित्वासह महत्वाकांक्षा पूर्तीची लढाई सुरु आहे. जनता मात्र नेत्यांच्या फ्रेमवर्क बाहेरच.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here