जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रूक येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालगृहात पाच मुलींवर लैंगिक अत्याचार व शोषणाच्या घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली. उघडकीस आलेला प्रकार ताजा असतांना अजून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अकरा वर्ष वयाच्या मुलावर देखील लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि त्याला मारहाण केल्याची तक्रार एरंडोल पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. याप्रकरणी संस्था अध्यक्षासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकरा वर्षाच्या बालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ दादाजी यशवंत पाटील (60), सचिन प्रभाकर पाटील (30), भूषण प्रभाकर पाटील (28), रा. ओमनगर धरणगाव रोड, एरंडोल), गणेश शिवाजी पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळजीवाहक शिवाजी पंडित याच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.
या बालकाचे बालकल्याण समितीसमोर जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर एरंडोल पोलिसात चारही जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पीडित मुलींबाबत महिला बालकल्याण समिती चौकशी करीत असताना हा दुसरा प्रकार देखील उघडकीस आला आहे. या फिर्यादी बालकाला मारहाण करणाऱ्या सातही अल्पवयीन बालकांना सध्या जळगाव येथील मुलांच्या निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.