तरुण विधवेचा विनयभंग – आरोग्य निरीक्षकांसह मुकादमाविरुद्ध गुन्हा

जळगाव : सफाई कामगार असलेल्या तरुण विधवेचा वेळोवेळी विनयभंग करणा-या नगरपरिषदेच्या दोघा आरोग्य निरीक्षकांसह मुकादमाविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर मंगल संदानशिव असे मुकादमाचे तर संतोष पंढरीनाथ बि-हाडे आणि युवराज श्रीपाद चव्हाण असे दोघा आरोग्य निरीक्षकांची नावे आहेत.

या घटनेतील पिडीता ही तरुण विधवा आहे. तिच्या पतीचे निधन झाले असल्यामुळे ती गेल्या सन 2021 पासून अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभागात सफाई कामगार म्हणून काम करते. ती प्रभागात सफाईचे काम करत असतांना आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण हा वेळोवेळी तिच्या अंगाला हात लावून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा असा सफाईकर्मीची तक्रार आहे. दुसरा आरोग्य निरीक्षक संतोष बि-हाडे हा गेल्या सहा महिन्यांपासून तु लग्न का केले नाही, तुला नव-याची आठवण येत नाही का? यासह विविध लज्जास्पद प्रश्न विचारुन तिच्या अंगाला हात लावत असल्याचा देखील सफाईकर्मीचा आरोप आहे.

27 जुलै रोजी सफाईकर्मी तरुणीने मदतीसाठी तिच्या मावसभावाला आणले असता तु एकटी येत जा असे मुकादम  ज्ञानेश्वर संदानशिव याने तिला बजावले. तु चांगले काम करत नाही, तुला सस्पेंड करुन टाकेन असे म्हणत त्याने तिला स्पर्श केला असल्याचा देखील सफाईकर्मीचा आरोप आहे. सफाईकर्मीने दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here