चर्चा तर होणारच! मोदीजींनी शरद पवारांनाही गुंडाळलं?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत पुण्यातील गौरव समारंभात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.  शरद पवार व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अशा बातम्या झळकल्या. थोरल्या पवारांनी तेथे ज़ाऊच नये असे काहींचे म्हणणे अशी एक प्रतिक्रिया उमटली. जनसामान्यांच्या भावनांना कोणी किती महत्त्व द्यावे? महाराष्ट्र विकास आघाडी आता इंडिया हे नवे नाव घेऊन भाजपविरोधात लोकसभा लढणार? या इंडियात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे शिवसेना सामील. त्यामुळे पंतप्रधान मोदीजी यांच्या भाजपशी दोन हात करण्यासाठी लढणा-यांची साथ सोडून मोदींसोबत शरद पवार कसे? हा प्रश्न जनतेला हैरान करतोय.

राजकीय नेते त्यांच्या भूमिकेचे नेहमीच (लंगडे का होईना) समर्थन करतात. लोकांना वरवरचं दिसतं. ताकाच्या बरणीत लोणी किती? पाणी किती? अगम्य. त्यामुळे कॉंग्रेस, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अरविंद केजरीवाल अशा अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्षांची अधिकृत जाहीर प्रतिक्रिया तूर्त गुलदस्त्यात. कुमार सप्तर्षीनीही विरोध केलेला.  तरीही पवार साहेब तेथे हजर राहणार म्हणजे “संभ्रम” वाढणारच.

शरद पवारांच्या निर्णयाचे सकारात्मक वाटचालीचे सूत्र सोशल मीडियावरून असे जाहीर झाले की ईडी संचालक संजय मिश्रा यांना 31 जुलै पर्यंत हटवावे अशी ताकीद दिली तरी मोदीजीना हे मिश्रा हवे आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यात अनेकांचा बंदोबस्त करायचा आहे. त्यात शरद पवारांना चिपकलेल्या जयंत पाटील यांना उचलण्याचा केव्हाही कार्यक्रम लागू शकतो. आता थोरले पवार एकतच नाही म्हटल्यावर पडद्याआड जालीम डोसचा संदेश पाठवला असावा असेही बोलले जाते. सोशल मीडियावर जी चर्चा झाली त्यात थोरल्या पवारांना केंद्रात दोन मंत्रीपदे असे आमिष दिल्याची चर्चा. शिंदे + अजित दादा + भाजपा मिळून सन 2024 च्या लोकसभेसाठी 45 जागांचे टार्गेट जमेना. सोशल मिडीया निवडणूक सर्व्हे धोक्याचा इशारा देत आहे. शिवाय सुप्रिम कोर्टाने ईडी संचालक संजय मिश्रा यांना नाही नाही म्हणत सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिलीच. मणीपूर कितीही जळले तरी त्यावर बहुसंख्य राजकीय पक्ष गप्प गप्प.

बहुसंख्य राज्यातील प्रादेशिक पक्ष सोयीची तबकडी वाजवतात. महाराष्ट्रात शिवसेना तोडलेली, रा.कॉ. तोडलेली. इंग्रजांची डिवाइड अ‍ॅंड रुल ही फोडाफोडी नीती यशस्वी होताना दिसलेली. त्यामुळे पक्ष वाचवण्याचे आव्हान. वरवर हे राजकारण नाही समाजकारण आहे. लोकमान्य टिळक स्वातंत्र्यलढ्याचे नायक म्हणून त्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात गैर काय? हा युक्तिवाद सोयीसाठी ठीकच असे काही लोकांना वाटते. तसे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी शरद पवारांचे समर्थन केले. समाजकारण करणारे जन सामान्य माणसे यांचा दृष्टिकोन मुळी संकुचितच. ते थोडासाच विचार करणार. राजकारणात विशाल दृष्टी ठेवावी लागते. आधी राजकीय अस्तित्व टिकवायचे नंतर लढत बसायचे.काही लढ्यात मिळवायचे काही तहात. काही पक्ष फोडून ही सारी साधने मोदीजीचा विजयी अश्वमेध जाहीरपणे पंगा घेऊन अडवण्याची सध्या कोणा एकात हिम्मत दिसत नाही. सर्व राजकीय पक्षांमध्ये खेकडा आणि बिभीषण प्रवृत्तीचा आजही धुमाकूळ. प्रत्येकाच्या स्वार्थी अजेंडा. नेत्यांनी कोणा कोणाला किती द्यावे? सगळ्यांची राजकीय बकासुरी भूक. महाराष्ट्रातले लोक सारे बघत आहेत. “तुका म्हणे उगे (गप्प) रहावे” जे जे होईल ते ते पहावे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here