जळगाव : रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलिसांच्या कामात हस्तक्षेप अडथळा आणून आरोपीस पळून जाण्यास मदत करणा-या तिघांसह एकूण चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. हसीनाबी राजीक अली (रा. तांबापुरा जळगाव) आणि अनिस हमीद पटेल उर्फ शेख (रा.तांबापुरा जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पो.नि. जयपाल हिरे यांच्या आदेशाने तांबापुरा परिसरातील रहिवासी, रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली यास ताब्यात घेण्याकामी गुन्हे शोध पथक गेले होते. त्याचा शोध घेत असतांना तो घरी आढळून आला.
सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ अल्ताफ पठाण, पोकॉ राहुल रगडे, पोकॉ विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, मपोकॉ निलोफर सैय्यद असे सर्वजण त्याला ताब्यात घेण्याची कारवाई करत असतांना त्याची आई हसीना राजीक अली हिने जोर जोरात आरडा-ओरड करत पथकाला शिवीगाळ केली. याचवेळी ईश्तियाक सोबत त्याचा साथीदार तथा रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिस हमीद पटेल हा देखील त्याठिकाणी पोलिस पथकाला आढळून आला. त्याने देखील पोलिसांच्या कामात अडथळा आणला. याशिवाय इश्तियाकची बहीण नाजीया हिने इश्तियाक यास पळून जाण्यास मदत केली.
विविध गुन्ह्यात इश्तियाक हा पोलिसांना हवा होता. मात्र तिघांच्या हस्तक्षेपाने तो पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्यविरुद्ध यापुर्वी घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या घटनेत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांसह पळून जाणारा इश्तियाक अशा चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसिना अली आणि अनिस पटेल या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोहेकॉ अल्ताफ पठाण यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोउनि रविंद्र गिरासे व पोहेकॉ सचिन मुंढे करत आहेत.