मुलीसोबत बोलणा-या तरुणाचा मारहाणीत मृत्यू – दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा

जळगाव : मुलीसोबत बोलतो याचा राग मनात ठेवून मुलीच्या दोघांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरण पावलेल्या तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर हरी पालवे असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या अंगावर मारहाणीचे वळ आढळल्याने त्याच्या घातपाताचा संशय वर्तवण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील सागर पालवे हा तरुण जळगाव येथे गुरांच्या बाजारातील विदर्भ रोड लाईन्स येथे चालक म्हणून नोकरीला होता. सागरच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना 7 सप्टेबर रोजी रात्री त्याचा फोन आला. आपल्याला दोघेजण बेदम मारहाण करत असल्याची माहिती त्याने आईला दिली. त्यावर वाहन मालकास सांगून मदत मागण्याचा सल्ला त्याला त्याच्या आईने दिला.

दुस-या दिवशी 8 सप्टेबर रोजी सकाळी त्याच्या आईने त्याला फोन लावला असता तो कुणीही उचलला नाही. सतत फोन केल्यानंतर सागरचा सहकारी चालकाने तो फोन उचलला. पलीकडून बोलणा-या सागरच्या सहकारी चालकाने त्याच्या आईला सांगितले की सागर झोपलेला आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी वाहन मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार सागरची आई थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेली असता सागर मृतावस्थेत आढळून आला.

त्याच्या अंगावर मारहाणीचे काळे निळे व्रणआढळून आले. त्याच्या पायास झालेल्या जखमेतून रक्त निघत होते. सागर काम करत असलेल्या वाहन मालकाने सागरच्या आईला दिलेल्या माहितीनुसार तो एका मुलीसोबत बोलत असल्याचा राग मनात धरुन दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय अधिकारी संदीप गावीत आदींनी भेट दिली. पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here