रखवालदाराचा खून करणा-या दोघांना अटक

जळगाव : जळगाव तालुक्यातील वावडदा नजीक बिलवाडी या गावी रखवालदाराचा खून करणा-या दोघा मारेक-यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अवघ्या चोवीस तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खूनाच्या गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन दोघा मारेक-यांना जेरबंद केले आहे. शेतमालकाचा सालदार आणि सालदाराचा शालक असे दोघे मारेकरी निष्पन्न झाले आहेत. सालदार पवन बहाधीर बारेला (रा. वाघाड ता.राजापूर जि. बडवाणी म.प्र.) आणि त्याचा शालक बाधरसिंग शोभाराम बारेला (रा.सानीकल – सालीतांडा ता.राजापुर जि. बडवाणी म.प्र.) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

ट्रॅक्टर चोरी करण्याच्या उद्देशाने शेतमालकाचा सालदार पवन बारेला आणि त्याचा शालक बाधरसिंग बारेला असे दोघे घटनेच्या रात्री शेतात आले होते. मात्र दोघांना ट्रॅक्टर चोरी करण्यापासून पहारेकरी पांडुरंग पाटील यांनी अडवले. ट्रॅक्टर चोरी करण्यास होत असलेला विरोध बघून दोघांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली जोडण्यासाठी वापरले जाणारे अवजड लोखंडी डाबर रखवालदार पांडुरंग पाटीला यांना मारुन फेकले. छातीत आणि डोक्यात लोखंडी डाबरचा वार झाल्याने रखवालदाराचा मृत्यु झाला.

रखवालदाराचा खून केल्यानंतर दोघांनी ट्रॅक्टर घेवून पलायन केले. मात्र रस्त्यात ट्रॅक्टर बंद पडले. ज्या ट्रॅक्टरसाठी दोघांच्या हातून खून झाला ते ट्रॅक्टर रस्त्यातच सोडून दोघांनी मोटार सायकलने पळ काढला. सासरी सालीतांडा येथे पळून आलेल्या पवन सह त्याचा शालक बाधरसिंग बारेला अशा दोघांना अटक करण्यात आली. घटनास्थळी मिळालेले पुरावे, गोपनीय माहिती तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाअंती शेतमालक राजेंद्र ईश्वर पाटील यांच्या शेतावरील फरार सालदार पवन बहाधीर बारेला याच्यावरील पोलिसांचा संशय बळावला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील स.पो.नि. निलेश राजपूत, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदिप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपासकामी दोघा संशयीत आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here