बाप लेकाने बस चालकास केली बेदम मारहाण

जळगाव : मुलीच्या मोटार सायकलला कट मारल्याचा आरोप करत बापलेकांनी मिळून बस चालकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम आंनंदा रायसिंग असे धरणगाव बस डेपोमधील जखमी बस चालकाचे नाव आहे. महेंद्र रविंद्र पाटील आणी तेजस महेंद्र पाटील (दोघे रा. नांदेड ता. धरणगाव) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक तुकाराम आनंदा रायसिंग आणि वाहक अशोक आत्माराम सोनवणे हे दोघे आपल्या ताब्यातील बस (एमएच बीटी 3019) प्रवाशांना घेऊन नांदेड येथून धरणगाव बस डेपो मधे पोहोचले होते. त्यावेळी नांदेड येथील रहिवासी महेद्रपाटील, त्यांचा मुलगा तेजस पाटील, मुलगी व पत्नी असे चौघे जण तेथे पोहोचले. तु माझ्या मुलीच्या मोटार सायकलीस कट मारुन पळून आला असे महेंद्र पाटील याने म्हणत दोघांनी चालक रायसिंग यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. त्यांच्या बचावासाठी वाहक अशोक सोनवणे आले असता त्यांना तेजस याने ढकलून दिले. तुझी बस डिझेल टाकून जाळून टाकू अशी धमकी दोघांनी त्यांना दिली.

यावेळी चालक रायसिंग यांच्या हातातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची व एक भार वजनाची चांदीची अंगठी ओढून घेतल्याचे तुकाराम रायसिंग यांचे म्हणणे आहे. जखमी अवस्थेत चालक तुकाराम रायसिंग यांना सुरुवातीला धरणगाव ग्रामीणरुग्णालयात व नंतर जळगाव येथे सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांनी दवाखान्यात दिलेल्या जवाबानुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार करिम सैय्यद करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here