भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे आज वितरण

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) – जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ सुप्रसिद्ध नाटककार पद्मश्री. सतीश आळेकर यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती सुमती लांडे, श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. अशोक कोतवाल तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. सीताराम सावंत यांना दि.१६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ला, कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे सन्मानपूर्ण वितरीत करण्यात येणार आहे. ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली, सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास असेल. या सह या सोहळ्यास निवड समितीचे सर्व सदस्यही उपस्थिती देणार आहेत.

कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. ‘भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. साहित्य कला क्षेत्रातील मानाचे पान असणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यप्रेमी, रंगभूमी कलाकार, कलाप्रेमींनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here