तहसीलदारांची बनावट सही करणा-या सहायकाविरुध्द गुन्हा

जळगाव : जमिनीच्या भोगवटा परवानगी पत्रावर महसूल विभागाच्या सहायकाने तहसीलदारांची बनावट सही केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसुली उत्पन्न बुडाले आहे. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन संशयित महसूल सहायक गजानन नरोटे याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे भोगवटा वर्ग एकमध्ये रुपांतरीत करून कृषकसाठी विक्री परवानगी मिळण्याकामी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित शेतकऱ्याने अर्ज दाखल केला होता. त्या अर्जानुसार संबंधीत मिळकतीच्या बाजार भाव मूल्यांकन रकमेच्या 75 टक्के रक्कम 3 लाख 26 हजार एवढी रक्कम शासकीय  खजिन्यात जमा करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना 27 जानेवारी 2023 रोजी तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या सहीनिशी कळवण्यात आले होते.

याच अर्जदारांना पुन्हा एका पत्राच्या माध्यमातून 3 नोव्हेंबर 2023 रोजी बाजारभाव मूल्यांकन रकमेच्या पन्नास टक्के रक्कम 2 लाख 24 हजार 163 रुपये जमा करण्याचे कळवण्यात आले. या पत्रावर तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांची बनावट सही    असल्याचे उघडकीस आले. महसूल सहायक गजानन नरोटे याने तहसीलदारांच्या पदनामाच्या बाजूला सही केल्याचे आढळून आले. संबंधीत जमीनीच्या विक्री परवानगी आदेशावरदेखील बनावट सही असल्याचे आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here