चाळीसगावसह धुळे, नाशिक ग्रामीणचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस

नाशिक : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणारे दहा आरोपी ताब्यात घेतले असून घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यापैकी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल दोन गुन्हे, चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन धुळे येथे दाखल एक, अहमदनगर येथील दोन आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील घोटी पोलिस स्टेशनचे दोन, इगतपुरी येथील दोन आणि दिंडोरी येथील एक असे एकुण दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस नाशिक ग्रामीण एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे.

दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात अज्ञात चोरटयांनी हॉटेल साई प्लाझाच्या किचनच्या खिडकीचे गज कापुन हॉटेलमध्ये प्रवेश करत गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काऊंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकुण 2 लाख 41 हजारांचा  मुद्देमाल चोरुन नेला होता. या घटनेप्रकरणी इगतपुरी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय गेल्या दोन महिन्यात इगतपुरीसह घोटी परिसरात अशाच प्रकारच्या घरफोडीच्या चार घटना हॉटेल्स आणि  वाईन शॉपमधे घडल्या होत्या. त्याबाबत चार गुन्हे दाखल झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी या घरफोडीच्या गुन्हयांमधील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत संकलीत केली. त्या माहितीच्या आधारे नजीकच्या काळात नाशिक शहर व मालेगावातील घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामीनावर सुटल्याची देखील माहिती मिळाली. जामीनावर सुटलेले हे गुन्हेगार सध्या गुन्हेगारीत सक्रीय झाल्याची देखील माहिती पुढे आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे यांनी आपल्या पथकातील सहका-यांना पुढील तपासकामी सक्रीय केले. तपासाची चक्रे फिरवून नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी (रा. ओटवरम, बिल्कापुर, जि. मलपुरम, राज्य केरळ, हल्ली मु. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, पेठरोड, नाशिक) याच्यावर सतत तीन दिवस-रात्र पाळत ठेवण्यात आली. अखेर त्याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले.  सखोल चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने त्याच्या नाशिक शहर व मालेगावातील साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिली.

हसन हमजा कुट्टी (रा. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, पेठरोड, नाशिक, मुळ रा. केरळ), दिलीप रुमालसिंग जाधव (रा. जेनेसीस पी. जी. फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश, अनिल छत्तरसिंग डावर (रा. जेनेसीस पी. जी., फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश), मुस्तफा अब्दुल अन्सारी (रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव नाशिक, मुळ रा. खेरटुंडा, झारखंड) सैय्यद इस्माईल सैय्यद जहुर (रा. अन्सारगंज, गल्ली नं. २, मालेगाव, जि. नाशिक),  सईद शेख मजिद उर्फ सईद बुडया (रा. जमहुर नगर, मालेगाव, जि. नाशिक), मोहम्मद अस्लम अब्दुल सत्तार (रा. अख्तराबाद, मालेगाव, जि. नाशिक), सैय्यद निजाम सैय्यद अन्वर (रा. आयशानगर, अनिस व्हिडीओ गल्ली, मालेगाव, जि. नाशिक, हनिफ खान इकबाल खान (रा. जमहुर कॉलनी, ६० फुटी रोड मालेगाव, जि. नाशिक), शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग (रा. नुमानीनगर, मालेगाव, जि. नाशिक) अशी अटकेतील सर्व गुन्हेगारांचीनावे आहेत. सर्वांना मालेगाव शहर व नाशिक शहरातील फुलेनगर पसिरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

सर्व गुन्हयांचा मास्टर माईंड हसन हमजा कुट्टी असून त्याच्याविरुद्ध घरफोडीचे एकुण 32 गुन्हे दाखल असून त्यापैकी 7 गुन्हयांमध्ये त्याला दोषसिध्दी झाली आहे. आरोपी शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग हा मालेगाव येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेण्यात आलेले इतर सर्व आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दरोड्याची तयारी, घरफोडी, चोरी असे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हसन कुट्टी याने मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटल्यावर साथीदारांसह घरफोडयांचे सत्र सुरु केले होते.

अटकेतील आरोपीतांनी दिलेल्या कबुलीनुसार घरफोडीचे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींनी कबुल केलेल्या सर्व गुन्ह्यांमधे चोरी केलेले विदेशी मद्य, मोटर सायकल, मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा व इटियॉस कार आणि आरोपी हसन कुट्टी याने चोरीच्या पैशांतुन विकत घेतलेली मोपेड दुचाकी असा सुमारे बारा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीतांना इगतपुरी, घोटी व दिंडोरी पोलीस स्टेशन येथील गुन्हयांमध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

नाशिक ग्रामीण पोलीसांनी घरफोडी करणारे आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करुन घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. अटकेतील आरोपीतांकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक (मालेगाव) अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि हेमंत पाटील, पोउनि संदिप पाटील, पोउनि नाना शिरोळे, सपोउनि शिवाजी ठोंबरे, पोहवा चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, किशोर खराटे, हेमंत गरूड, सतिष जगताप, पोना विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, पोकॉ योगेश कोळी, दत्ता माळी तसेच विशेष पथकातील पोहवा संतोष हजारे, पोना विजय वाघ, सुनिल पाडवी, चंद्रकांत कदम यांच्या पथकाने घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here