खूनासह मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस शस्त्रांसह अटक 

जळगाव : पुणे येथील समर्थ पोलीस स्टेशनला दाखल खूनासह मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस चार गावठी पिस्टलसह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक  केली आहे. आमीर आसीर खान (रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) असे त्याचे नाव  आहे. त्याचा साथीदार आदित्य भोईनल्लु (रा. पुणे) हा फरार होण्यात यशस्वी झाला असून दोघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 10 मार्च रोजी चाळीसगाव शहर  पोलिस स्टेशन हद्दीतील धुळे रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने मोटार सायकलवर येणारे दोघे मोटार सायकलस्वार पोलिस पथकाला आढळून आले. रस्त्यात नाकाबंदी सुरु असल्याचा अंदाज घेत मोटार सायकलवरील डबलसिट बसलेला तरुण पळून गेला. पोलिस पथकाने मोटार सायकलस्वारास अडवून त्याच्याकडील बॅगची तपासणी तसेच त्याची चौकशी केली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमीर आसीर खान याच्या बॅगेत गावठी बनावटीचे चार पिस्टल, पाच  मॅगझीन व दहा जीवंत काडतुस असा ऐवज आढळून आला. त्याच्या ताब्यातील मोटार सायकल व बॅगेतील मुद्देमालासह त्याला अटक करण्यात आली. सुमारे 2 लाख 1हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक  करण्यात आलेला आमीर खान व त्याचा फरार साथीदार आदित्य भोईनल्लु या दोघांविरुद्ध चाळीसगांव शहर पोलीस स्टेशला गुन्हा रजि. क्रं. 110/24 शस्त्र अधिनियम कलम 3/25, भादवि कलम 34 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) (3) चे उल्लघंन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमीर आसीर खान हा प्राणघातक हल्ले करणारा सराईत, तडीपार गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन पुणे येथे प्राणघातक हल्ला, खून तसेच संघटीत गुन्हेगारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे पटलावरील आमीर हा गेल्या सहा महिन्यापासून फरार होता. त्याच्याविरुद्ध एकुण सहा  गंभीर गुन्हे दाखल असून त्याला पुणे जिल्हयातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अटकेतील आमीरचा फरार साथीदार आदित्य भोईनल्लु याच्या मागावर पोलिस असून त्याचा शोध सुरु आहे. आमिर खान  याच्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा कुठून आला. त्याचा कुठे घातपात करण्याचा कट होता काय याबाबत तपास सुरु आहे.  

चाळीसगाव शहर  पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्या पथकातील सपोनि सागर एस. ढिकले, पोलिस उप निरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना महेंद्र पाटील, पोकॉ. पवन पाटील, पोकॉ मनोज चव्हाण, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पो.कॉ. प्रकाश पाटील व उज्वलकुमार म्हस्के करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here