जागतीक जल दिन औपचारीकता राहू नये! – डॉ. बी.डी. जडे, वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

जागतिक जल दिन हा दरवर्षी २२ मार्च रोजी जगभर साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने रिओ डि जानेरिओ (ब्राझील) येथे २२ मार्च हा दिवस जागतीक जल दिन म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले. आपल्याकडील स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व पाण्याच्या साठ्यांचे शाश्वत संरक्षणाकरीता कार्यरत राहणे ह्याचा संदेश देण्याकरीता ह्याचा उद्देश आहे. २२ मार्च २०२४ ह्या जागतीक जल दिनाचा संदेश आहे शांततेसाठी पाणी. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही हे माहिती असुनही पाणी वापराबाबत कोणीही फारसे गंभीर नाही. शांततेसाठी पाणी हे वाचल्यानंतर लगेचच लक्षात येते गल्लोगल्ली, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, तालूका-तालूक्यात, जिल्हा-जिल्ह्यात, राज्या-राज्यामध्ये, देशा-देशांमध्ये पाण्याकरीता वाद सुरू आहेत.  तसे पाहिले तर पाणी हे पुरेसे आहे परंतु त्याचा वापर, त्याचे व्यवस्थापन काटेकोर नाही, डोळसपणे केले जात नाही. म्हणून तर त्यामधून वाद  निर्माण होतात.

पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्षाची ठिणगी टाकू शकते. जेव्हा पाण्याचा वाटप असमान होतो त्यावेळी लोकांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये तणाव निर्माण होतो. जेथे-जेथे पाणी आहे तेथील जीवन सुखमय आहे, त्या भागात समृद्धी आलेली बघावयास मिळते. परंतु जेथे भरपूर पाणी आहे आणि जेथे पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी, भिषण अवस्था आहे तेथे दोघही ठिकाणी समस्या आहेत. जागतीक जल दिन २०२४ मधून संदेश असा आहे की पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्ष निर्माण करू शकते. समृद्धी आणि शांतता पाण्यावर अवलंबून असते. पाणी आपल्याला संकटातून बाहेर काढू शकते. ह्या करीता पाण्याच्या संबंधीत असणाऱ्या, पाण्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाने हे गांभीर्याने समजून घेतले पाहिजे आणि ह्या मोहीममध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. ह्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील लहान-मोठा सदस्य शाळा, महाविद्यालये, खाजगी कंपन्या, सरकारी कंपन्या, कार्यालये, विविध संस्था, शासन ह्यांनी एकमेकांमध्ये संवाद ठेवून पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने, योग्यतेने कसा होईल, पाण्याचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी, खबरदारी कशी घेता येईल ह्यावर विचार मंथन चिंतन केले पाहिजे.

प्रामुख्याने शेतकरी वर्गाने अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जगाच्या एकुण फक्त ४% पाणी आपल्याला उपलब्ध आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी ९७% पाणी समुद्रांमध्ये आहे, २% पाणी बर्फाच्या स्वरूपात उत्तर आणि दक्षिण धृवांवर उपलब्ध आहे. ०.४% पाणी १००० मिटर पेक्षाही खोल आहे, ते पाणी खारवट आहे. फक्त ०.६% पाणी हे गोडपाणी आहे आणि सर्व गोष्टीसाठी वापर करावयाचा आहे. आपल्याकडे भूपृष्ठावरील पाणी आणि भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. उपलब्ध पाण्यापैकी ८०% पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो, तर उर्वरीत पाण्याचा वापर उद्योगधंदे आणि नित्य गरजांकरीता वापर केला जातो. शेती व्यवसायामध्ये पाण्याचा प्रचंड वापर होतो, तसेच पाण्याचा अपव्ययही होतो. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये पाण्याचा वापर काळजीपूर्वक होण्याची गरज आहे. खुप जादा पाणी वापर करूनही पिकांचे उत्पादन वाढत नाही हे अजूनही शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, हे लक्षात येण्याची गरज आहे. ह्याकरीता ठिबक सिंचन, तुषार सिंचन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याचा कमी वापर करूनही अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळेल.

शेती व्यवसाय बरोबरच कारखानदारी, उद्योगधंदे करणाऱ्यांनी सुद्धा पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला पाहिजे. कारखान्यातून निघालेल्या पाण्याचा पूनरवापर करण्याची यंत्रणा उभारली  पाहिजे.  घरगुती  वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा वापराबाबतही जनजागृती झाली पाहिजे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सकाळपासून दिवस निघाल्यापासून दिवस संपेपर्यंत ज्या-ज्या वेळी पाण्याचा वापर होणार आहे, तो काटकसरीने कसा होईल ह्यावर कार्यवाही झाली पाहिजे. राजस्थान सारख्या वाळवंटी भागात, ज्या खेड्यांमध्ये शेतीला पाणी नाही, पिण्याच्या पाण्याकरीता महिलांची होणारी पायपीट पाण्याचे महत्त्व सांगणारी आहे. ह्यातून खरंतर बोध घेतला पाहिजे आणि पाण्याचा जपून, काटकसरीने वापर करण्याचे शिकले  पाहिजे. पाणी नसेल तर सर्वांचे अस्तीत्व संपण्यास वेळ लागणार नाही. म्हणून पाण्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाने आपल्याकडील पाण्याचा कार्यक्षम, काटकसरीने वापर तसेच पाण्याच्या साठ्यांचे संरक्षण केले पाहिजे. नाहीतर पाणी नाही तर जीवन नाही ! जागतीक जल दिन नुसते औपचारिक रित्या साजरे न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दररोज केली पाहिजे. जागतीक जल दिन केवळ एक दिवस न राहता तो रोज कसा व्यवहारात आणता येईल हीच काळाची गरज आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here