तरुण हट्टेकट्टे, तरीही बाळगतात गावठी कट्टे!! —अंगवळणी कसे पडले बरे कारवाईचे रट्टेखट्टे?

जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): चोपडा तालुक्यातील उमर्टी हे गाव गावठी कट्ट्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत असलेले हे लहानसे गाव गावठी कट्टे निर्मितीचे केंद्रस्थान म्हटले जाते. या ठिकाणाहून राज्यातील विविध भागात गावठी कट्टे वितरीत केले जातात. दरवर्षी जळगाव पोलिस दलाच्या माध्यमातून वेळोवेळी शेकडो कारवाया केल्या जातात. तरीदेखील उमर्टी येथील गावठी कट्टे निर्मितीचा कारखाना बंद होऊ शकला नाही.  

चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाच्या हद्दीत रोहीत दिवाकर वाघमारे या अहमदनगर येथील तरुणाविरुद्ध नुकतीच कारवाई करण्यात आली. 25 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, तिन हजार रुपये किमतीचे तिन जिवंत काडतुस, दिड लाख रुपये किमतीची बुलेट गार्ड आणि एक हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला. शनिवारच्या रात्री चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. अशा शेकडो कारवाया वेळोवेळी झाल्या आहेत.  

जळगाव शहरासह जिल्ह्यात गावठी कट्टयाच्या माध्यमातून गोळीबार करण्याचे बेधडक प्रकार सर्रास वाढले आहेत. असे असले तरी चोपडा तालुक्यातील उमर्टी येथील गावठी कट्टा कारखाना जमीनदोस्त करण्याची कारवाई अद्याप झाल्याचे ऐकीवात नाही. ज्याप्रमाणे गावठी दारुच्या निर्मितीवर कारवाई होते, त्यांचे रसायन नष्ट केले. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या वेश्या वस्तीवर कारवाई होते, ती जागा रिकामी केली जाते. त्या धर्तीवर गावठी कट्ट्यांच्या निर्मीतीवर कारवाई केली जात नसल्याचा नाराजीचा सुर जनतेत आवळला जात आहे. गावठी कट्टे निर्मीती आणि वितरणाचा प्रश्न रा.कॉ. चे नेते एकनाथराव खडसे यांनी देखील विधानपरिषदेत उपस्थित केला होता.  

काही महिन्यांपुर्वी जळगाव येथील कानळदा रस्त्यावर एका टोळक्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. या घटनेमुळे त्यावेळी जळगाव शहरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत “पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन”च्या माध्यमातून प्रश्‍न उपस्थित केला होता. हा कारखाना बंद करण्याची गरज असल्याचे खडसे यांनी म्हटले होते.   

त्यावेळी विधीमंडळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गावठी कट्टा काय असते? असा प्रश्‍न खडसे यांना विचारला होता. त्यावेळी माहिती देतांना खडसे म्हणाले होते की होय, ते पिस्तुल असते परंतू, गावठी पध्दतीने सायकलचे स्पेअर पार्ट वगैरे वापरुन ते तयार केलेले असते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे त्यांची निर्मिती होते.  गुन्हेगार या गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर करत आहेत असेही खडसे यांनी म्हटले होते. गावठी कट्ट्यांविरुद्ध आणि ते बाळगणा-यांविरुद्ध एवढ्या कारवाया करुन देखील कट्ट्यांचा वापर बंद  झालेला नाही. पोलिस कारवाईला हे गुन्हेगार सरावले आहेत असे म्हणावे लागेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here