अतिप्रसंगानंतर महिलेचा खून करणा-यास अटक

जळगाव : अतिप्रसंगानंतर महिलेचा धारदार शस्त्राने खून करुन तिचा मृतदेह गिरणा नदीपात्रात अर्धवट बुजून पुरावा नष्ट करणा-या संशयित इसमाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायाबाई सजन मोरे (वरखेडे खु. ता. चाळीसगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. संतोष धोंडु भिल (रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.दोघां मधे प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर आली आहे.

दिनांक 03/04/2024 रोजी सकाळी वरखेड बु. येथील पोलीस पाटील यांनी मेहुणबारे पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि  संदिप परदेशी यांना नदीपात्रात एका अज्ञात महिलेच्या अर्धवट पुरलेल्या मृतदेहाची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर सपोनि परदेशी यांनी आपल्या  स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सुमारे तीनशेच्या जवळपास गावकरी जमले होते. 

पोलीस पाटील व पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी, तहसिदार, वैदयकीय अधिकारी, गुन्हे शोध पथक, श्वान पथक, फॉरेन्सिक पथक आदींना माहिती देत बोलावून घेत पुढील तपास आणि कारवाईला सुरुवात केली. सर्वांसमक्ष महिलेचा मृतदेह बाहेर काढला असता तो गावकऱ्यांसह नातेवाईकांनी ओळखला.

ओळख पटलेल्या मयत मायाबाई सजन मोरे हिच्या डोक्यावर,  दोन्ही कानाजवळ, डोळयाजवळ, छातीवर, मांडीवर चाकूसारख्या हत्याराने व दगडाने जखमा केल्याचे दिसुन आले. मयत मायाबाईला जिवे ठार मारुन तिचा मृतदेह गिरणा नदी पात्रातील वाळूच्या ढिगा-यात अर्धवट बुजून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संतोष धोंडू भिल यास तापासाअंती अटक करण्यात आली आहे. 

नजीकच्या मक्याच्या शेतात मिळालेल्या पुराव्यावरुन मयत महिला मायाबाई हिच्यावर बलात्कार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांनी दिलेल्या सुचनेनुसार तपासाची चक्रे जलद गतीने फिरवुन गुन्हयातील संशयीत आरोपीची गुप्त माहीती संकलित करण्यात आली. गुन्हाची माहीती मिळाल्यापासुन तीन तासाच्या आत संशयित आरोपीस ताब्यात घेवुन त्यास बोलते करण्यात आले. 

संशयित आरोपी संतोष धोंडु भिल (रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव) आणि मयत महिला एकाच समाजाचे आहेत. ती रहात असलेल्या वरखेडे गावापासुन तीन किलोमिटर अंतरावर आरोपी राहणारा असुन त्यांच्यात प्रेम संबंध संमतीने सुरु होते. त्यातुन मध्यरात्री आरोपी हा मयत महीलेस भेटण्यास मक्याच्या शेतात गेला होता. दोघांची मक्याच्या शेतात भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. रागाच्या भरात संशयीत आरोपी संतोष भिल याने मयत महीले सोबत अतिप्रसंग करुन धारदार शस्त्राने हल्ला करुन तिला जिवे ठार केले. त्यानंतर शेता शेजारी असलेल्या गिरणा नदी पात्रातील वाळूत अर्धवट अवस्थेत तिचा मृतदेह बुजण्याचा  प्रयत्न केला. 

गुन्हयाच्या तपासकामी तसेच आरोपी अटक करण्याकामी सपोनि संदिप परदेशी, पोउपनिरी विकास शिरोळे, पोउपनिरी रमेश घडवजे, पोउपनिरी गोपाल पाटील, सफौ मिलींद शिंदे, पोहेकॉ नितीन सोनवणे, पोना दिपक नरवाडे, पोना प्रकाश कोळी, पोकॉ गोरख चकोर, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ सुदर्शन घुले, पोकॉ हनुमंत वाघेरे, पोकॉ जितुसिंग परदेशी, पोकॉ निलेश लोहार आदिंनी परिश्रम घेतले. या गुन्हयात मयत महिलेचे जेठ सर्जेराव विक्रम मोरे (रा. वरखेडे खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 गुरन 82/2024 भादवि 302, 376, 324,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here