माजी नगरसेवक अजय जाधव यांना सहा महिने कारावास

जळगाव : वाळू उत्खननापोटी दिलेला धनादेश न वटल्याने जळगावचे माजी नगरसेवक अजय राम जाधव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय अनुक्रमे 26 लाख 98 हजार आणि दहा हजार रुपये असे दोन दंड देखील करण्यात आले.

सन 2016 – 17 या कालावधीत शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथील वाळू गटातून सुनंदाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे दीपक सुधाकर पाटील यांना वाळू उपसा करण्याचा परवाना मिळाला होता. याच वाळू गटातून दीपक पाटील यांच्यासह अजय राम जाधव यांनी देखील वाळू वाहतूक सुरु केली. उसनवारीने देण्यात आलेल्या वाळूच्या उत्खननापोटी जाधव यांच्याकडे 19 लाख 75 हजार बाकी होती. त्यापैकी जाधव यांनी 75 हजार रुपये दिले. 

त्यानंतर अजय जाधव यांनी त्यांची मे. साई एंटरप्राईज या संस्थेचा 19 लाख रुपयांचा दीपक पाटील यांना दिलेला धनादेश वटला नाही. त्यामुळे दीपक पाटील यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली.

या खटल्याच्या सुनावणीअंती न्या. व्ही.एम. देशमुख यांनी अजय जाधव यांना सहा महिने कारावास, 26 लाख 98 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची शिक्षा सुनावली. दीपक पाटील यांच्यावतीने अँड. मुकेश शिंपी व अँड. स्वाती भोयर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here