गोदावरी रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची झाली अदलाबदल

Godavari hospital jalgaon

जळगाव : काही दिवसांपुर्वी नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून मृतदेहाची अदलाबदल झाली होती. नाशिकचा मृतदेह भोपाळ येथील नातेवाईकांच्या ताब्यात तर भोपाळ येथील मृतदेह नाशिककरांच्या ताब्यात देण्यात आला होता. ही घटना ताजी असतांना असाच एक गलथान कारभार जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गालगत असलेल्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला आहे. या घटनेमुळे मयत नातेवाईकांच्या भावनेशी खेळ झाला असल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की भुसावळ येथील खडका रोड, मुस्लीम कॉलनी येथील रहिवासी महिला फातेमाबी समद पिंजारी यांना गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यत आले होते. तपासणी व उपचाराअंती फातेमाबी यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला होता. दरम्यान उपचार सुरु असतांना फातेमाबी यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी मयत फातिमाबी यांचा मृतदेह नातेवाईकांना व्यवस्थित पाहू दिला नाही अशी नातेवाइकांची तक्रार आहे. अंत्यविधीच्या वेळी मयत महिलेच्या मुलाने आपल्या आईचा चेहरा बघण्याचा हट्ट धरला.

त्यावेळी मृतदेह पाहिला असता नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला. याचे कारण म्हणजे तो मृतदेह दुस-याच कुणातरी मयत महिलेचा होता. आपल्या भावनांसोबत हा खेळ झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी उमटण्यास वेळ लागला नाही. या घटनेचे वृत्त सर्वत्र पसरण्यास वेळ लागला नाही.याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता रुग्णालय प्रशासनाकडून व्यवस्थीत उत्तरे देण्यात आली नाही असा नातेवाईकांनी आरोप केला.

देण्यात आलेला मृतदेह हा कोरोना पॉझीटीव्ह तर नसेल? असा प्रश्न या निमित्ताने मयत फातिमाबी यांच्या नातेवाईकांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणी दोषींवर कारवाई होण्याची मागणी करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तो मृतदेह जळगाव येथील दादावाडी येथील एका महिलेचा असल्याचे समजले.

हे देखिल वाचा मृतदेहांची अदलाबदल -फारुख शेख यांची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here