जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): भारतीय संस्कृतीत स्त्री पुरुषांचे विवाहबाह्य संबंध हे अनैतिक संबंध समजले जातात. या अनैतिक संबंधाला आळा बसण्यासाठी समाजात विवाह संस्था अस्तित्वात आली आहे. भारतीय संस्कृतीत विवाह संस्थेला अनन्य साधारण महत्व आहे. विवाहानंतर पती पत्नीचा एकमेकांवर कायदेशीर मार्गाने हक्क प्रस्थापित होतो. पुरुषाचे परस्त्रीसोबतचे संबंध समाजाला मान्य नसतात. असे संबंध सामाजिक अपराध समजला जातो. सामाजिक कुंपनात राहून रितीरिवाजाप्रमाणे पुरुष आणि स्त्रीच्या संबंधास देव, ब्राम्हण आणि नातेवाईकांच्या साक्षीने विवाह संस्थेच्या माध्यमातून रितसर मान्यता दिली जाते. मात्र तरीदेखील काही विवाहीत स्त्री-पुरुष अनैतिक संबंधाच्या अर्थात चुकीच्या दिशेने वाटचाल करतात. अनैतिक संबंधाचा अपराध लपवण्यासाठी अशा स्त्री पुरुषांकडून कोणता तरी गुन्हा घडतो आणि ते कायद्याच्या कचाट्यात सापडतात. अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी वाईट होत असतो.

धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील मालपूर या लहानशा गावी सागर बापु चौधरी हा तरुण रहात होता. मोबाईल विक्री हा त्याचा व्यवसाय होता. सागर रहात असलेल्या मालपूर या गावी त्याचे मामा देखील रहात होते. त्याच्या मामाचे साडू सुरत येथे राहतात. त्या साडूंना पुजा नावाची मुलगी आहे. मामाच्या साडूची मुलगी पुजा ही सुरतहून मालपूर येथे तिच्या मावशीकडे अर्थात सागरच्या मामाकडे अधूनमधून येत असे. सुरत येथून पुजा आली म्हणजे तिची आणि सागरची नजरानजर होत असे. सागर मामाच्या घरी हक्काने जात असे. त्यामुळे त्याची पुजासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर भेटीगाठी घेण्यात अर्थात सहवासात झाले. सहवासाचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांना समजलेच नाही. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या मनात एकमेकांच्या प्रेमाचा अंकुर फुलत गेला. या अंकुराचे फुलात रुपांतर झाले. मालपूर येथे आलेली पुजा पुन्हा सुरतला गेली म्हणजे इकडे सागरचा जीव कासाविस होत असे. अशीच परिस्थिती पुजाची देखील होत असे.


बघता बघता दिवसामागून दिवस जात होते. दरम्यानच्या कालावधीत पुजाचे अमळनेर तालुक्यातील मारवड येथील तुषार चिंधू चौधरी या तरुणासोबत लग्न झाले. शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा तुषारचा व्यवसाय होता. आई वडीलांच्या मर्जीपुढे पुजाचे काहीही चालले नाही. तिला मुकाटपणे आई वडीलांनी सुचवलेल्या तुषारच्या स्थळाला होकार द्यावा लागला. लग्नानंतर पुजा सुरत येथून तिच्या अमळनेर तालुक्यातील मारवड या गावी तिच्या सासरी राहण्यास आली. त्यानंतर काही दिवसांनी सागरचे देखील एका तरुणीसोबत लग्न झाले. काळ पुढे पुढे सरकत होता. काळाच्या ओघात दोघांच्या संसाराचा पसारा वाढत गेला. पुजाला तिचा पती तुषार पासून एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. सागरला देखील त्याच्या पत्नीपासून एक मुलगी झाली. लग्नापुर्वीची प्रेमकथा विसरुन पुजा आणि सागर यांनी आप आपल्या संसारात रममाण होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. दोघांना आपला संसार आणि मुलेबाळे असतांना देखील त्यांच्यातील ओढ आणि आकर्षण कमी झाले नाही.

विवाहीत पुजाच्या आकर्षणातून सागर मालपूर येथून थेट अमळनेर येथे येत होता. सागर अमळनेर येथे आल्याचे समजताच काही ना काही बहाण्याने पुजा मारवड येथून अमळनेर येथे त्याला भेटण्यासाठी येत होती. विवाहीत पुजा पतीला खोटे सांगून अमळनेरला आली म्हणजे सागरला हायसे वाटत होते. तो तिला घेऊन अमळनेर शहरात मौजमजा करत असे. सागर नेहमी नेहमी अमळनेर येथे जात असल्याचे बघून त्याच्या पत्नीला शंका येण्यास सुरुवात झाली. त्यातून दोघा पती पत्नीत वादाची ठिणगी पडू लागली. या वादातून सागरची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली.
पत्नी सोडून गेल्याने एकटा पडलेला सागर आता विवाहीत पुजाला पळवून नेण्याचा आणी तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार करु लागला. पुर्वाश्रमीचा प्रियकर आणि आता विवाहीत असलेल्या सागरच्या प्रेमात पुजा देखील आकंठ बुडाली होती. तिला पती, संसार आणि दोन मुले यांचा देखील विसर पडू लागला. दिवस रात्र तिला तिच्या नजरेसमोर सागरचा चेहरा दिसत होता. सागरला देखील स्वप्नात पुजा दिसत असे. मात्र आपल्या प्रेमात पुजाचा पती तुषार अडथळा ठरत असल्याचे त्याला जाणवत होते. पुजाचा पती तुषार याला कायमचे संपवले तर आपल्या प्रेमातील अडथळा दुर होईल आणि आपण पुजासोबत पळून जाऊन लग्न करु शकतो असा कुविचार त्याच्या मनात चमकत होता. याबाबत पुजा आणि सागर यांच्यात मोबाईलवर नेहमी बोलणे होत असे. आपल्या प्रेमात अडसर ठरणारा पती तुषार याला कायमचे संपवण्यावर पुजा देखील सहमत झाली. सागर आणि पुजा या दोघांनी मिळून तुषारला संपवण्याचा कुविचार केला. त्या दृष्टीने दोघांनी व्युहरचना सुरु केली.
अखेर 5 डिसेंबर रोजी तुषारच्या जीवनातील तो काळा दिवस उजाडला. या दिवशी सागरने सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पुजाला तिच्या मोबाईलवर कॉल केला. यावेळी तुषारला ठार करण्याबाबत पुन्हा एकवेळा दोघांची सहमती झाली. ठरल्यानुसार सागर मालपूर येथून त्याच्या विना क्रमांकाच्या मोटार सायकलने अमळनेरला येण्यास निघाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास सागर अमळनेरला आला. त्याने पुजाला फोन करुन काहीही बहाणा करुन तुषारला अमळनेरला पाठव असा निरोप दिला.
माझा एक नातेवाईक लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी अमळनेरला आला आहे. त्याला पत्ता शोधून देण्यासाठी तुम्ही अमळनेरला जा अशी लाडीक विनवणी पुजाने तिचा पती तुषारला केली. पुजाचा नातेवाईक रात्रीच्या वेळी अमळनेरला आल्याचे बघून तो त्याच्या भेटीला आणि मदतीला गेला. नातेवाईकाच्या रुपात काळ बनून आलेला सागर हा अमळनेरला तुषारची वाटच बघत होता. तुषार येताच सर्वप्रथम सागरने त्याला त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवर बसवले. एका वाईन शॉपवरुन सागरने मद्याची एक बाटली विकत घेतली. पत्रिका वाटण्यापुर्वी आपण मद्यपार्टी करु अशी सागरने तुषारला ऑफर दिली. मद्यपानाच्या आमिषाने आपण यमलोकाच्या दारी जात आहोत याची पुसटशी देखील कल्पना तुषारला आली नाही. तुषारने देखील त्याच्या परिचयातील एका हॉटेलमधून मांसाहारी जेवण, पाण्याच्या दोन बाटल्या आणि पाणी पिण्याचे प्लॅस्टिकचे दोन ग्लास विकत घेतले. अशा प्रकारे दोघांनी फिफ्टी फिफ्टी खर्चाचा भार उचलत ओसाड जागी मद्यपान आणि मांसाहार करण्याचे ठरवले. मंगरुळ गावाच्या ओसाड जागेत दोघे जण गेले. या ओसाड जागी दोघांनी अगोदर मद्यपानास सुरुवात केली.




अगोदरच तयारीत असलेल्या सागरने मद्य पिण्याचे केवळ नाटक सुरु केले. कधी गोड बोलून तर कधी हक्काने बळजबरी करुन सागरने तुषारला मोठ्या प्रमाणात मद्यपान करण्यास भाग पाडले. तुषार आता शेवटचा घोट घेत असल्याचे बघून सागरने लघवीला जाण्याचा बहाणा केला. लघवीला जाण्याचा बहाणा करुन सागर त्याच्याजवळून उठला. काही अंतरावर जावून सागरने एक वजनदार दगड दोन्ही हातांनी उचलला. तो वजनदार दगड सागरने नशेच्या अधिन झालेल्या तुषारच्या डोक्यात हाणला. अवजड दगड डोक्यात बसताच तुषार तेथेच जमीनीवर कोसळला. तुषार जमीनीवर कोसळताच सागरने पुन्हा तोच दगड उचलून पुन्हा त्याच्या डोक्यात हाणला. केवळ पुजासाठी अंगात सैतान शिरलेल्या सागरने तुषारच्या अंगावर बसून त्याच्या कानावर बुक्के मारले. त्यामुळे तुषारची हालचाल कायमची बंद झाली.
तुषार मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर सागरने त्याचा मृतदेह एका खड्ड्यात कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने टाकून दिला. त्यानंतर लगबगीने सागर मालपूर गावाच्या दिशेने मार्गस्थ झाला. वाटेत पांझरा नदी पार केल्यानंतर सागरने पुजासोबत मोबाईलवर संपर्क साधला. तुषारला जीवे ठार केल्याची माहिती सागरने पुजाला दिली. त्यानंतर बराच वेळ दोघांचा मोबाईलवर एकमेकांसोबत संपर्क सुरु होता.




दरम्यान बरीच रात्र झाली तरी देखील तुषार घरी परत आला नाही. त्यामुळे त्याची आई हवालदिल झाली. तुषार अद्याप घरी परत आला नाही म्हणून त्याची पत्नी पुजा देखील चिंता करण्यासह परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचे नाटक करु लागली. तुषारला फोन लावण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र तो उचलत नव्हता. 6 डिसेंबर 2024 चा दुसरा दिवस उजाडला तरी देखील तुषार घरी आला नाही. दरम्यान सकाळी उजेड पडल्यानंतर तुषारचा मृतदेह परिसरातील गावक-यांच्या नजरेस पडला. हळू हळू या घटनेची माहिती गावात पसरण्यास वेळ लागला नाही. स्थानिक पोलिस पाटील यांनी या घटनेची माहिती अमळनेर पोलिस स्टेशनला दिली. या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर मयताजवळच दारुची बाटली, रिकामे ग्लास असे साहित्य पडलेले होते. दरम्यान घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या चर्चेतून मयत हा मारवड येथील तुषार चौधरी असल्याचे पोलिसांना समजले.
तुषारचा चुलत भाऊ मधुकर धुडकु चौधरी यांना या घटनेची माहिती देण्यात आली. मयताची खात्री पटवण्याकामी मधुकर चौधरी यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. आपला चुलत भाऊ तुषार याचा घातपात झाल्याची माहिती समजताच मधुकर चौधरी यांनी निवडक नातेवाईकांसह अमळनेर गाठले. त्यावेळी त्यांना समजले की तुषारचा मृतदेह पोलिसांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकामी दाखल केला आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी तुषार यास मयत घोषित केले.




अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर मधुकर चौधरी यांनी तुषारचा मृतदेह निरखून पाहीला. हा आपलाच चुलत भाऊ तुषार असल्याची त्यांची खात्री झाली. हा आपलाच चुलत भाऊ तुषार असल्याचे त्यांनी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांना कथन केले. मयताची ओळख पटली असली तरी त्याचा मारेकरी कोण आणि त्याने तुषारला का ठार केले हा तपास महत्वाचा होता. तुषारच्या डोक्यावर आणि डाव्या बाजूस गंभीर दुखापत झालेली दिसून येत होती. त्याच्या डोक्यासह कानातून रक्त निघाले होते.
या घटने प्रकरणी मयत तुषारचा चुलत भाऊ मधुकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 560/24 भारतीय न्याय संहिता 103(1) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला.
पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. घटनास्थळ हे औद्योगीक वसाहत परिसरातील होते. त्या परिसरात मयत कुणासोबत, कसा व किती वाजता आला त्याबाबत सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे अचुक वेळ आणि माहिती घेण्यात आली. रात्री 10 वाजून 14 मिनीटांनी मयत हा मोटार सायकलवर डबलसिट बसून आला होता. त्यानंतर त्याच्या सोबत असलेला दुचाकीचालक एकटाच रात्री अकरा वाजेच्या सुमारास अमळनेरच्या दिशेने जातांना सीसीटीव्ही फुटेजमधे दिसून आले. त्यामुळे हा दुचाकीचालकच तुषारचा मारेकरी होता हे जवळपास निश्चीत झाले होते. त्यानंतर अमळनेर गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यात हाच दुचाकीचालक धुळे शहराच्या दिशेने जातांना आढळून आला. त्यानंतर मयत घरुन नेमका किती वाजता निघाला ती वेळ देखील तपासण्यात आली. अशा प्रकारे वेळेचे सर्व गणित समजून घेण्यात आले.
त्यानंतर मयत तुषारची पत्नी पुजा आणि आई अशा दोघींची चौकशी करण्यात आली. या चौकशीत मयत तुषारची आई धाय मोकलून रडत होती. या उलट त्याची पत्नी पुजा मात्र अजिबात रडत नव्हती. त्यामुळे पोलिसांची पारखी नजर येथेच कणखर बनली. संशयाची पाल चुकचुकल्यानंतर त्या दृष्टीने तपासाला सुरुवात करण्यात आली. पुजा आणि तिचा मयत पती तुषार या दोघांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले. त्यात पुजाच्या कॉल डीटेल्स मधे सागर चौधरी याच्यासोबत कित्येकदा बोलणे झाल्याचे पोलिस पथकाला आढळून आले. त्यानंतर सागर चौधरी याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याच्यादेखील मोबाईलचा कॉल तपशील तपासण्यात आला. एकंदरीत त्याच्यावर देखील पोलिसांना संशय येण्यास सुरुवात झाली. एकंदरीत सागर आणि पुजा या दोघांच्या कॉल डीटेल्सनुसार दोघेही संशयाच्या भोव-यात सापडले होते. पुजा आणि सागर यांच्यात भरपूर वेळा मोबाईल संभाषण झाले होते.
पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी तिची सखोल चौकशी केली असता ती फार वेळ खोटे बोलू शकली नाही. लग्नाच्या पुर्वीपासून तिचे सागरवर प्रेम होते. पुजा आणि सागर हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. दरम्यान तिचे लग्न मारवड येथील तुषार चौधरी याच्यासोबत लावून देण्यात आले. दरम्यान तिचा पती तुषार याला व्यवसायातील आर्थिक घसरणीमुळे मद्यपानाची सवय जडली. त्यामुळे तो मद्यपानाकडे वळला होता. त्यामुळे देखील पुजा वैतागली होती. दरम्यान सागरची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. तिने सागर विरुद्ध न्यायालयात फारकतीसाठी दाद मागितली होती. त्यामुळे सागर हा देखील पत्नीमुळे वैतागला होता. एकंदरीत पुजा आणि सागर हे एकमेकांकडे आकर्षित झाले होते. दोघे अमळनेरला भेटले म्हणजे मौजमजा करत होते.
अखेर संशयीत पुजा चौधरी आणि संशयीत सागर चौधरी या दोघांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास डीवायएसपी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे व त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष नागरे, मिलिंद सोनार, कैलास शिंदे, पो.कॉ. शेखर साळुंखे, राजेंद्र पाटील, निलेश मोरे, नितीन कापडणे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, उज्वलकुमार म्हस्के, होमगार्ड पुनमचंद हटकर आदींचे सहकार्य लाभत आहे.