जळगाव : चार लाख 85 हजार रुपये किमतीचा लसुन नागपूर येथून नियोजित ग्राहकास न पोहोचवता स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी जळगावला आणून अपहार करणा-या टेम्पो चालका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार टेम्पो चालकाचा शोध देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक करत आहेत. विनोद गणेश रुढे (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) असे या फरार टेम्पो चालकाचे नाव आहे.
नागपूर येथील टाटा ओनियन कंपनीचे संचालक श्याम रमेश मनवानी यांनी टेम्पो चालक विनोद गणेश रुढे यास 4 लाख 85 हजार रुपये किमतीचा लसुन बुखारो रांची या ठिकाणी पोहोचवण्याचे काम दिले होते. मात्र टेम्पो चालक विनोद रुढे याने नियोजित स्थळी लसूण न पोहोचवता तो जळगाव येथे आणून परस्पर सुप्रीम कॉलनी येथील ईश्वर प्रकाश राठोड यांच्या बंद बेकरीत आणून ठेवला. या प्रकाराची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करुन खात्री करण्यास सांगितले.
सहायक पोलिस निरिक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस नाईक रवींद्र परदेशी, पो शि शशिकांत मराठे, रतन गीते, नरेंद्र मोरे, राहुल पाटील आदींनी दोन पंचा समक्ष बेकरीची झडती घेतली असता त्या बंद बेकरीमध्ये 4 लाख 85 हजार रुपये किमतीचा 97 गोण्या लसुन आढळून आला. बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना सदर माला बाबत पोलिस पथकाने विचारपूस केली असता त्यांनी पोलीस पथकाला सांगितले की, त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुढे याने हा माल कुठून तरी विकत आणला आहे. मात्र माल खरेदीबाबतची कोणतीही बिले त्यांच्याकडे दिलेली नाही. या लसुन साठ्याच्या मालकी हक्काबाबत शंका आल्याने पोलीस पथकाने संपूर्ण लसूण साठा ताब्यात घेत तो मूळ मालक शाम मनवानी यांच्या ताब्यात दिला. फरार विनोद रुढे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत.