जळगाव : विवाह सोहळ्यातून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी तसेच वृद्ध इसमांच्या ताब्यातील रोख रकमेच्या बॅगांची चोरी झाल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील चोरी झालेला मुद्देमाल मध्यप्रदेशातील आरोपींच्या नातेवाईकांकडून हस्तगत करण्यात आला आहे. चाळीसगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, अमळनेर आणि भडगाव या पोलीस स्टेशनला हे गुन्हे दाखल होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गेल्या महिन्यात 17 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव येथील विराम गार्डन लॉन्स येथे झालेल्या लग्न सोहळ्यात विवाहितेचे सोने चांदीचे दागिने चोरी झाले होते. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम दोन लाख रुपये असा एकूण 12 लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वृद्ध इसमांच्या ताब्यातील रोख रकमेच्या बॅगा चोरी झाल्या प्रकरणी दाखल असलेले मुक्ताईनगर, अमळनेर आणि भडगाव या पोलीस स्टेशनला दाखल गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दीड लाख रुपये, भडगाव पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील 1 लाख 35 हजार रुपये आणि अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील रोख चाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण, गणेश वाघमारे पो.ना भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ महेश पाटील , महेश सोमवंशी, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नितीन सोनवणे, पोकॉ किरण देवरे तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे हेकॉ राजकुमार चव्हाण, पोना सुरेश मेंढे, पोकॉ सुनिल मोरे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.