घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफीया सक्रीय आहे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करुन एमपीडीए दाखल करा, कुणाचीही गय करु नका, असे निर्देश अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
वाळू तस्करांकडे संबंधित उप विभागीय अधिकारी, तहसीलदारांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेही विभागीय आयुक्त श्वेता सिंघल या वेळी म्हणाल्या. वाळू चोरी अतिशय गंभीर बाब आहे. महसूल कर्मचा-यांना वाळू चोरट्यांकडून मारहाणी सारखे प्रकार होत असल्यास अशा व्यक्तीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. या वेळी विभागीय आयुक्तांनी महसूल, जिल्हा परिषद, जलसंधारण, पाणी टंचाई अशा विविध विषयाचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अमीत रंजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उप जिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.