जळगाव : चोरीच्या एक क्विंटल तांब्याच्या तारांसह दोघा संघटीत गुन्हेगार चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. रितेश संतोष आसेरी आणि रणजीतसिंग जिवनसिंग जुन्नी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या कब्जातून 54 हजार रुपये किमतीच्या शंभर किलो वजनाच्या जुन्या व नविन तांब्याच्या तारांचे बंडल हस्तगत करण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील जगवानी नगर भागातील दुकानातून जुन्या व नव्या तांब्याच्या तारा चोरी झाल्या होत्या. दुकानाचे शटर उचकावुन चॅनल गेट कापून प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी हा चोरीचा गुन्हा केला होता. या गुन्ह्यात 1 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने तांत्रीक व खबरीच्या माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा तपास सुरु केला. रितेश संतोष आसेरी याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील पोकॉ राहुल घेटे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्याला तो रहात असलेल्या पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने हा गुन्हा कबुल करत त्याचा साथीदार रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी याचा देखील सहभाग असल्याचे कबुल केले.
रणजीतसिंग जुन्नी याला रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतून तो पळून जात असतांना पाठलाग करुन पकडण्यात आले. पोउपनि राहुल तायडे, हे. कॉ. गणेश शिरसाळे, चंद्रकांत धनके, पो.ना प्रदीप चौधरी, पो. काँ नितीन ठाकुर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव, पोलीस अंमलदार स.फौ.विजयसिंग पाटील, रवि नरवाळे, अक्रम शेख आदींच्या पथकाने चोरीचा 54 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्हयाचा तपास पोउपनि राहुल तायडे व पोकॉ योगेश घुगे करत आहेत.