जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आकाश पंडीत भावसार हा तरुण जळगाव शहराच्या अयोध्या नगर परिसरातील अशोक नगर भागात रहात होता. आकाश जेमतेम विस वर्षाचा असतांना त्याच्या वडीलांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर आकाश कमी अधिक प्रमाणात खचला. मात्र काही दिवसातच त्याने स्वत:ला सावरले. लवकरच तो मोठ्या हिमतीने स्वबळावर उभा राहीला. जळगाव शहराच्या अजिंठा चौफुली परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर भागात त्याने हर्षाली ट्रान्सपोर्ट या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायातून त्याने गगनभरारी घेतली. व्यवसायाच्या माध्यमातून आकाशच्या हातात पैसा खुळखुळ करु लागला.

ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु असतांना आकाशने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय देखील सुरु केला होता असे म्हटले जाते. आकाशवर लक्ष्मीची कृपा असतांना त्याचे पुजा नावाच्या तरुणीवर प्रेम जडले. आकाश आणि पुजा यांच्यातील संभाषण दिवसेंदिवस वाढत गेले. संभाषणातून सहवास आणि सहवासातून दोघांचे एकमेकांवरील प्रेम घट्ट होत गेले. दोघांनी एकमेकांसोबत प्रेमविवाह करण्याच्या आणाभाका घेतल्या. आकाश आणि पुजा भिन्न समाजाचे होते. मात्र जातीपातीच्या भिंती तोडून, समाजातील काही नातेवाईकांचा विरोध झुगारुन दोघांनी एकमेकांसोबत सन 2018 मधे प्रेमविवाह केला. प्रेमविवाहानंतर आकाशची प्रेयसी पुजा त्याची रितसर पत्नी झाली. पत्नीच्या रुपात पुजा त्याच्या घरी राहण्यास अर्थात संसार करण्यास आली.

आकाशसोबत पुजाने लग्न करण्यास तीच्या माहेरच्या काही नातेवाईकांचा विरोध होता. त्यात तिचा मावसभाऊ अजय मंगेश मोरे याचा देखील या लग्नाला विरोध होता असे म्हटले जाते. सर्व विरोध झुगारुन आकाश आणि पुजा एकमेकांचे जीवनसाथी झाले. बघता बघता दोघांचा संसार फुलत आणि बहरत गेला. दोघांच्या संसार वेलीवर सुरुवातीला एका पुत्ररत्नाचे आगमन झाले. त्यांनी त्याचे नाव श्री असे ठेवले.
दोघांच्या लग्नानंतर नवलाईचे नऊ दिवस भरकन निघून गेले. पहिले पुत्र रत्न झाल्यानंतर दोघांच्या संसारात काही ना काही कारणावरुन कुरबुरी सुरु झाल्या. या कुरबुरींना वैतागून पुजा तिच्या माहेरी निघून गेली. ती माहेरी निघून गेल्यानंतर तिचा मावसभाऊ अजय मंगेश मोरे तिच्या संपर्कात आला असे म्हटले जाते. अजय हा नात्याने पुजाचा मावसभाऊ असला तरी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेची धग तिचा पती आकाशपर्यंत गेली आणि त्याच्या मनाचा भडका उडाला. पुजा आणि अजय यांच्यातील चर्चेने आकाशच्या मनात संशयाने जागा घेतली. त्यामुळे त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
काही दिवसांनी वाद कमी अधिक प्रमाणात सौम्य झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या सासरी आकाशकडे राहण्यास आली. अजयच्या विषयावरुन दोघा पती पत्नीत पुन्हा वादाची ठिणगी पडू लागली. दोघा पती पत्नीमधील वाद पोलिसात गेला. पोलिसांनी दोघांमधे समेट घडवून आणला. समेट घडल्यानंतर पुन्हा दोघे गुण्यागोविंदाने आपल्या संसाराला लागले. दरम्यानच्या कालावधीत आकाश आणि पुजा यांच्या संसार वेलीवर दुसरे पुत्र रत्न झाले. त्यांनी त्याचे नाव मित असे ठेवले.
अधूनमधून कमी अधिक प्रमाणात आकाश आणि पुजा या पती पत्नीमधे धुसफुस सुरुच होती. त्यामुळे आकाशची आई तिच्या विवाहीत मुलीकडे भुसावळ तालुक्यात राहण्यास निघून जात असे. आकाशच्या आईच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे तिला घरातील वाद सहन होत नव्हता. त्यामुळे ती अधूनमधून मुलीकडे राहण्यास जात होती असे म्हटले जाते.
दोघा पती पत्नीत अजयच्या विषयावरुन निर्माण होणारा वाद कधी कधी उफाळून येत होता. त्यामुळे एके दिवशी संतापाच्या भरात आकाशने अजयला चौदावे रत्न दाखवले अर्थात चांगला चोप दिला. तेव्हापासून अजयच्या मनात आकाशबद्दल चिड निर्माण झाल्याचे म्हटले जाते. आकाशला एके दिवशी चांगली अद्दल घडवायची असे अजयला राहून राहून वाटत होते. काळ पुढे पुढे सरकत होता. पुजा आता पुर्णपणे आपल्या संसारात रममाण झाली होती. दोघांच्या संसारात अजय हा विषय जवळपास संपला होता. मात्र आकाशने दिलेला मार अजय विसरला नाही. आकाशला जन्माची अद्दल घडवायची असे अजयने मनाशी निश्चित केले. त्याने आपल्या मनातील विचार त्याचा मित्र सोनू गोपाल चौधरी याच्याकडे बोलून दाखवला. अजयला जीवे ठार करण्यासाठी त्याने सोनूची मदत घेण्याचे ठरवले. सोनूने देखील अजयच्या विचाराला सहमती दर्शवली. त्यासाठी सोनूने आपल्याजवळ असलेल्या पिस्टलने आकाशला ठार करण्याचे नियोजन केले.

3 मे 2025 वार शनिवार, या दिवसाची पहाट आणि रात्र आकाशच्या जीवनातील अखेरची ठरली. या दिवशी अजयने सोनूसह त्याच्या साथीदारांच्या मदतीने आकाशचा काटा काढण्याचे निश्चित केले. या दिवशी सायंकाळी अजय मोरे, सोनू चौधरी आणि एक अल्पवयीन मुलगा असे तिघे मेहरुण तलावाच्या ट्रॅकवर मद्यपान करत होते. मद्यपान करतांना अजय आणि सोनू या दोघांनी मिळून आकाशचा खात्मा करण्याचे नियोजन सुरु केले. या नियोजनाची सुत्रे अजयकडून सोनूने आपल्या हाती घेतली. बराचवेळ तिघेजण मेहरुण ट्रॅकवर मद्यपान करत होते. त्यानंतर तिघेजण ते रहात असलेल्या कासमवाडी परिसरात अंधार पडल्यानंतर आले.
कासमवाडी परिसरात एका झाडाखाली असलेल्या बाकावर पुन्हा तिघेजण सोबत बसले. यावेळी अजय पुन्हा बियर पिण्यास बसला. आज आकाशला पिस्टलच्या गोळीने ठार करायचे हे सोनूच्या मनात होते. मात्र तरीदेखील पर्यायी व्यवस्था म्हणून कोयता सोबत बाळगण्याचे देखील त्याने नियोजन केले होते. सोनूच्या मनातील विचार केवळ अजयला चांगल्या प्रकारे माहिती असला तरी प्लॅनचा रिमोट केवळ सोनूकडेच होता.

काही वेळाने अजयच्या ओळखीचा अजून एक अल्पवयीन मित्र त्याठिकाणी आला. नंतर आलेल्या अल्पवयीन मुलाला सोनूने त्याच्या एका परिचिताकडे जावून कोयता घेऊन येण्याचे फर्मान सोडले. त्या अल्पवयीन मुलाने निमुटपणे ठरलेल्या ठिकाणी जावून हाती पडलेला कोयता कापडात गुंडाळून आणला आणि तो सोनूच्या हवाली केला.
पिस्टलसह गरज पडल्यास प्रसंगी अतिरिक्त हत्यार म्हणून कोयता हाती पडल्यानंतर सोनूने सगळ्यांना आपल्यासोबत चलण्याचे फर्मान जारी केले. त्यावेळी रात्रीचे साडे नऊ वाजले असावेत. अजय, सोनू आणि दोघे अल्पवयीन असे चौघे जण सोनूच्या इशा-यावर त्याच्यासोबत दुचाकीवर जाण्यास निघाले. कुठे जायचे आहे? काय करायचे आहे? कसले नियोजन करायचे आहे हे सर्व सोनूला माहिती होते. सोनूला फक्त अजयकडून आकाश रहात असलेल्या घराच्या पत्त्याची गरज होती. मात्र अजयला आकाशच्या घराचा पत्ता निट सांगता येत नव्हता.
सोनूच्या ताब्यातील अॅक्टीव्हा गाडीवर चौघे जण पुढे जाण्यास निघाले. एस.टी. वर्क्स शॉपजवळ असलेल्या मद्याच्या अड्ड्यावर सोनूने गाडी उभी केली. काही वेळाने ते सोनूच्या घरी गेले. त्यानंतर अजयने चेतन रविंद्र सोनार या मित्राला फोन करुन त्याच्या एका परिचीताला डबलसीट घेऊन येण्यास सांगितले. काही वेळातच चेतन याने त्या परिचीताला स्प्लेंडरवर डबलसीट बसवून आणले. अजयने त्या परिचीताला आकाशच्या घराचा पत्ता विचारला. मात्र त्या परिचितालादेखील आकाशच्या घरचा माहिती नव्हता. त्यामुळे चेतनसोबत आलेल्या त्या परिचिताला सर्वांनी वाटेत सोडून देत त्याची सुटका केली.
आकाश भावसार याच्या घराचा पत्ता काही केल्या कुणालाच समजत नव्हता. त्यामुळे आकाश रहात असलेल्या परिसरात थेट जावून लोकांना विचारुन त्याचे घर शोधण्याचे अजय आणि सोनू यांनी ठरवले. सोनूच्या ताब्यातील अॅक्टीव्हा आणि चेतनच्या ताब्यातील स्प्लेंडर अशा दोन्ही वाहनांवर बसून पाचही जण आकाशचे घर शोधण्यासाठी तो रहात असलेल्या अयोध्या नगर परिसरात गेले. त्यावेळी रात्रीचे जवळपास साडेदहा वाजले होते. या गल्लीतून त्या गल्लीत सर्वांनी चकरा मारल्या. मात्र अजयला आकाशचे घर आठवत नव्हते, सांगता येत नव्हते आणि लवकर सापडतही नव्हते.
अखेर एका गल्लीत गेल्यावर एका बंद घराचा दरवाजा सोनूने वाजवला. यावेळी सावधगिरीचा उपाय म्हणून अजय आणि त्याच्यासोबत असलेला एक अल्पवयीन मुलगा असे दोघे जण त्या घरापासून लांब उभे राहिले. त्या घरासमोर चेतन आणि दुसरा अल्पवयीन मुलगा असे दोघे थांबून होते. सोनूने दार वाजवले नेमके तेच घर आकाशचे निघाले. मात्र तो घरी नव्हता. घराचा दरवाजा वाजवून देखील आतून कुणी उघडत नव्हते. मात्र त्या घराच्या बाजूच्या खिडकीत सोनूला एक विवाहिता दिसली. सोनूने त्या विवाहीतेला आकाश भावसारचे घर कोणते आहे अशी विचारणा केली. त्यावर तीने घराची कडी बाहेरुन लावली असल्याचे सांगत दाराची कडी बाहेरुन उघडण्यास सांगितले. सोनूसोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने त्या घराची बाहेरुन लावलेली कडी उघडली. दार उघडल्यानंतर ती विवाहीता बाहेर आली. हेच घर आकाशचे असून काय काम आहे असे त्या विवाहीतेने सोनूला विचारले. ती विवाहीता आकाशची पत्नी पुजाच होती.




प्रसंगावधान राखत सोनूने पुजाला म्हटले की आम्हाला आमची गाडी गहाण ठेवून आकाशकडून व्याजाने पैसे घ्यायचे आहे. त्यावर पुजाने त्याला म्हटले की आम्ही पुर्वी व्याजाने पैसे देत होतो. मात्र आता आम्ही देत नाहीत. आकाशचा नेमका ठावठिकाणा मिळवण्यासाठी सोनूने त्याला फोन लावण्यास पुजाला सांगितले. पुजाने साध्या मनाने तिचा पती आकाशला तिच्या मोबाईलचा स्पिकर ऑन करुन फोन लावला. तुम्ही कुठे आहात? असे विचारत आपल्या घरी कुणीतरी दोन मुले आली आहेत, ती मुले गाडी गहाण ठेवून व्याजाने पैसे मागत असल्याचे त्याला सांगितले. त्यावर पलीकडून आकाशने त्याच्या घरी आलेल्या सोनूसोबत स्पिकर ऑन केलेल्या फोनवर बोलणे केले. त्याने सोनूला तुझे नाव काय?, तुला माझ्याकडे कुणी पाठवले?, माझ्या घराचा पत्ता तुला कुणी दिला? असे विविध प्रश्न विचारले. त्यावर सोनूने आकाशला एवढेच सांगितले की मला गाडी गहाण ठेवून व्याजाने पैसे हवे आहेत. त्यावर पलीकडून आकाशने सोनूला म्हटले की मी कालिंक माता मंदीराजवळ श्री प्लाझा जवळ असलेल्या ए – वन भरीत सेंटरजवळ उभा आहे. या ठिकाणी मला भेटायला ये, आल्यावर आपण सविस्तर बोलू. काही भानगड झाली आहे का? असा भाबडा प्रश्न पुजाने तिचा पती आकाशला घाई गडबडीत फोनवर विचारला. त्यावर पलीकडून काही नाही असे म्हणत त्याने फोन कट केला.




या सर्व घडामोडी दरम्यान सावधगिरी बाळगत अजय आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार असे दोघे घरापासून लांब उभे होते. घरासमोर पुजाच्या ओळखीचा जवळचा नातेवाईक चेतन सोनार दिसताच तिने त्याला ओळखले. त्यावर तिने त्याला काही भानगड झाली आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने तिला काही टेंशन नाही असे म्हणत काढता पाय घेतला. मात्र त्याचवेळी पुजाने अजयला देखील पाहिले. सोनूला पुढे करुन अजय मागे लपून उभा असल्याचे पुजाच्या लक्षात आले. अजयला पाहताच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्या पतीसोबत काहीतरी अघटीत होणार अशी शंका तिला सताऊ लागली. सर्व जण लगबगीने एका पाठोपाठ दुचाकींवर जात असल्याचे बघून पुजाला काहीतरी गडबड असल्याची शंका आली. तिने लागलीच पती आकाशला सावध होण्याचा इशारा देण्यासाठी एका पाठोपाठ सलग दोन ते तिन वेळा फोन केले. मात्र आकाशचे दुर्दैव असे की त्याने पत्नी पुजाचा एकही फोन त्यावेळी उचलला नाही.
चेतन चालवत असलेल्या स्प्लेंडर गाडीवर एक अल्पवयीन आणि सोनू चालवत असलेल्या अॅक्टीव्हा गाडीवर त्याच्यामागे दुसरा अल्पवयीन आणि त्याच्या मागे ट्रिपलसीट अजय असे पाचही जण जाण्यास निघाले. वाटेत सोनूने धावत्या गाडीत त्याच्याजवळ असलेला कोयता डबलसिट बसलेल्या अल्पवयीन मुलाकडे दिला. काही झाले तर तु त्याला मार एवढेच त्याने त्या अल्पवयीन मुलाला सांगितले. कुणाला मारायचे, कशासाठी मारायचे हे चेतनसह दोघा अल्पवयीन मुलांना माहितीच नव्हते. त्यामुळे हातात कोयता घेतलेल्या त्या अल्पवयीन मुलाने चेतनला काय झाले असे विचारले असता त्याने मला माहिती नाही असे त्याला सांगितले.


रात्रीचे अकरा वाजले होते. तेवढ्यात पाचही जण आकाशच्या समोर ए-वन भरीत सेंटरजवळ साक्षात यमराजाच्या रुपात हजर झाले. त्यावेळी आकाशसोबत दोन मुले उभी होती. त्यापैकी पांढरा शर्ट आणि काळी पॅंट घातलेला हाच आकाश आहे का? असा प्रश्न सोनूने अजयला केला. त्यावर अजयने हाच आकाश आहे असे उत्तर सोनूला दिले.
सोनूकडून अपेक्षित उत्तर मिळताच सोनूने थेट आकाशच्या शर्टाची कॉलर पकडली. आकाशला काही समजण्याच्या आत सोनूने त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले. आकाशच्या डोक्याच्या दिशेने पिस्टल रोखून सोनूने गोळी झाडली. नेमकी त्याच वेळी ती गोळी पिस्टलमधे अडकली मात्र मोठा आवाज झाला. पिस्टलमधे अडकलेल्या गोळीचा आवाज ऐकून आकाशच्या सोबत असलेली दोन्ही मुले घटनास्थळावरुन भरीत सेंटरच्या दिशेने घाबरुन पळाली.
पिस्टलची गोळी अडकल्याने फायर झाली नाही मात्र आवाज झाला. त्यामुळे सोनूने आकाशला जमीनीवर खाली पाडले. त्याचवेळी अजयने त्याच्या कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला. तो चाकू अजयने आकाशच्या पाठीवर जोरात मारला. सोनूने त्याच्यासोबत गाडीवर बसलेल्या अल्पवयीन मुलाला वाटेत कोयता दिला होता. त्या कोयत्याने आकाशला मारण्यास सोनूने त्याला सांगितले. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाने देखील आकाशच्या कमरेवर पाठीमागे व कमरेच्या बाजूला कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.
पुढच्या क्षणी सोनूने आकाशला जमीनीवर लोळवले. कोयत्याने वार करणारा अल्पवयीन बाजुला होताच अजयने आकाशच्या छातीमधे चाकू खुपसला. मात्र तो चाकू आकाशच्या छातीमधे अडकला. आकाशच्या छातीमधे अडकलेला चाकू अजयने पुर्ण ताकदीनिशी ओढून बाहेर काढला. त्यानंतर अजयने आकाशच्या डोक्यावर, हातावर, पायावर आणि मांडीवर देखील वार केले.
आकाश आता पुर्णपणे अजय आणि सोनूच्या तावडीत सापडला होता. जखमी अवस्थेतील विव्हळणारा आकाश अजयकडे दयेची भिक मागत होता. अजय मला माफ कर. अजय माझ्याकडून चुक झाली असे आकाश वारंवार अजयला सांगत होता. मात्र चिडलेला अजय समजण्याच्या पलीकडे गेला होता. आकाशने यापुर्वी केलेली मारहाण अजयच्या जिव्हारी लागली होती. आता वेळ अजयची होती.
जीव वाचवण्यासाठी आकाश पुर्ण ताकदीनिशी कसाबसा उठून उभा राहीला आणि श्री प्लाझाच्या दिशेने पळू लागला. आकाश पळत सुटल्याचे बघून “याला सोडू नका नाहीतर हा आपल्याला नंतर मारुन टाकेन” असे अजय ओरडला. मात्र घटनास्थळावर जास्त वेळ थांबणे चुकीचे ठरेल असा अंदाज सोनूने व्यक्त केला आणि लागलीच पलायन करण्याचे ठरवले. सोनूने काढता पाय घेण्याचे ठरवल्यामुळे सर्वजणांनी देखील तेथुन निघून जाण्याचे निश्चित केले. स्प्लेंडर गाडीवर चेतन आणी एक अल्पवयीन तसेच अॅक्टीव्हा गाडीवर सोनू, अजय आणी दुसरा अल्पवयीन मुलगा असे पाचही जण काळे पेट्रोल पंप, एसटी वर्क्स शॉप – नेरी नाका मार्गे इच्छा देवी मंदीराकडून पाचोरा शहराच्या दिशेने पळून गेले. वाटेत संशयीत आरोपींनी त्यांच्याकडील हत्यार वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत कपडे लपवून ठेवले.
या घटने दरम्यान आकाशची आई कोकिळा आपल्या मुलीकडे वरणगाव येथे मुक्कामी गेली होती. घरी त्याची पत्नी पुजा एकटीच होती. या घटनेची माहिती परिसरात पसरण्यास वेळ लागला नाही. रक्ताच्या थारोळ्यातील जखमी आकाशला नातेवाईकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक साजिद मंसुरी, पोलिस उप निरीक्षक ढिकले व कर्मचारी वर्गाने तातडीने घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेतली. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी देखील तातडीने रुग्णालयात धाव घेत आपल्या सहका-यांना तपासकामी महत्वाच्या सुचना दिल्या.
आकाशचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती त्याची आई कोकिळा भावसार यांना नातेवाईकाकडून समजली. माहिती मिळताच त्याची आई व बहिण अशा दोघी मायलेकी तातडीने जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येण्यास निघाल्या. रुग्णालयात दाखल आकाशला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले होते. आपल्या मुलाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह बघून त्याच्या आई व बहिणीने हंबरडा फोडला. रात्रीच्या वेळी रुग्णालयातील या मायलेकींचा आक्रोश बघून उपस्थितांचे काळीज काही क्षणासाठी हादरले.
मयत आकाशची आई कोकिळा भावसार यांनी त्यांची सुन पुजा, घटनास्थळावरील घटना बघून भितीपोटी पळून जाणारे त्याचे दोघे मित्र आणी इतरांकडून घटनाक्रम समजून घेतला. आपल्याच सुनेने आकाशचे लोकेशन मारेक-यांना दिल्याचा समज मयत आकाशच्या आईसह बहिणीचा झाला. त्यामुळे गैरसमजातून सुन पुजाला संशयाच्य पिंज-यात ओढण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे कोकिळा भावसार यांनी शनीपेठ पोलिस स्टेशनला सुरुवातीला अजय मंगेश मोरे, चेतन रविंद्र सोनार आणि तिन अनोळखी अशा पाच संशयितांविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न. 102/2025 कलम 103, 189 (2), 191(2), 191(3), 190 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साजिद मंसुरी यांनी सुरु केला. याशिवाय या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांनी देखील आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला.
अजय मोरे, चेतन सोनार आणी दोघे अल्पवयीन असे चौघेजण शिरसोली रस्त्यावर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांना तांत्रीक विश्लेषणासह खब-यांकडून समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, आदींनी चौघांना शिरसोली रस्त्यावरुन ताब्यात घेतले. दोघा संशयीतांना अटक करण्यात आली तर दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरीत सोनू चौधरी याला शनीपेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पो.कॉ. अनिल कांबळे, निलेश घुगे आणि पराग दुसाने या दोघांनी मेहरुण परिसरातून ताब्यात घेत अटक केली. अशा प्रकारे पाचही संशयीत पोलिसांच्या हाती आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी संदीप गावीत, शनीपेठ पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साजीद मंसुरी करत आहेत.