जळगाव : लग्न समारंभात आलेल्या वृद्ध महिलेच्य गळ्यातील सोनसाखळी चोरुन नेणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. अनिल विजय हरताडे (रा. लक्ष्मी नगर गेंदालाल मिल जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हा केलेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी परिसरातील एका लॉनमधे असलेल्या लग्न समारंभात एक वृद्ध महिला आली होती. एका रुममधे ती वृद्ध महिला असतांना अनिल हरताडे हा त्याठिकाणी आला. तुमच्या गळ्याला काहीतरी लागले असून मी काढून देतो अशी बतावणी करत त्याने महिलेच्या गळ्यातील 21 ग्रँम वजनाची सोन्याची चेन लांबवली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा अनिल हरताडे यानेच केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांना मिळाली. तसेच तो जळगाव शहरात फिरत असल्याची माहिती देखील त्यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम शेख, बाबासाहेब पाटील आदींनी पुढील तपास व कारवाईकामी रवाना केले.
अनिल हरताडे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला पुढील कारवाईकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.