नाशिक : नाशिक शहर पोलिस मुख्यालयातील चौघा पोलिस अंमलदारांनी खूनातील दोघा आरोपींसोबत उपनगर परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये ‘ओली पार्टी’ केल्याची खळळजनक घटना उघडकीस आली. पोलिस अंमलदार संशयित हवालदार पद्मसिंह राऊळ, अंमलदार दीपक जठार, विक्की चव्हाण आणि गोरख गवळी अशी या चौघा पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिस आयुक्तांकडून कारवाईचे आदेश काढण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या दोघांना न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेत शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालय गाठले. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर चौघा पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघा संशयित आरोपींना बेड्या लावून वाहनात बसवून पुन्हा कारागृहाच्या दिशेने प्रवास सुरु केला. पोलिस वाहन उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर त्यांनी तेथे ‘ब्रेक’ घेतला. दुपारी साडेचारच्या सुमारास एका रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी कैद्यांच्या सोबतीने मांसाहाराचे भोजन केले. हा प्रकार एका सुजाण नागरिकांच्या लक्षात आला. त्याने हा प्रकार लागलीच पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. पोलीस आयुक्तांनी याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी जाऊन रितसर कारवाई करण्याचे आदेश दिले.