जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सक्रीय राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा

जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा राजकीय व्यक्तींसोबतचा वावर अर्थात होत असलेली उठबस, भाजपच्या तिरंगा यात्रेत त्यांचा उत्स्फुर्त सहभाग बघता ते आपल्या पदाचा राजीनामा देऊन सक्रीय राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यासह राज्यात सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रोटोकॉल पायदळी तुडवला असल्याची देखील या निमीत्ताने चर्चा सुरु झाली आहे.

केवळ जिल्हाधिकारी आयुष प्रसादच नव्हे तर जिल्ह्यातील दोन बड्या अधिका-यांनी देखील भाजपच्या तिरंगा यात्रेत सहभाग घेत प्रोटोकॉलचा भंग केल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्या तुलनेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हेच काहीसे वरचढ ठरले  आहेत. भाजप नेते गिरिष महाजन आणि खासदार स्मिता वाघ यांच्यासमवेत ते कारमधे बसून प्रवासाला निघत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओ मधे पुढच्या सिटवर ड्रायव्हरच्या शेजारी गिरीष महाजन आणि मागच्या सिटवर खासदार स्मिता वाघ बसल्या असल्याचे दिसते. मागच्या सिटवर खा. स्मिता वाघ यांच्या शेजारी मध्यभागी चक्क जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यकर्त्या प्रमाणे बसले असल्याचे या व्हिडीओ मधे दिसते. जिल्हा प्रशासनाच्या एका बड्या उच्च पदस्थ अधिका-याने राजकीय व्यक्तींच्या वाहनात बसून जाणे हे निश्चितच प्रोटोकॉलला धरुन नसल्याचे म्हटले जात आहे.

जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्य सचिव, उच्च न्यायालयाचे मुख्य सचिव आदींकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रोटोकॉल बाबत तक्रार केली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे भाजपच्या तिरंगा यात्रेत संरक्षण देण्यासाठी गेले होते की सहभाग घेण्यासाठी गेले होते अशी गुप्ता यांनी त्यांना विचारणा केली आहे. तथापी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा तिरंगा यात्रेतील सहभाग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तुलनेत नगण्य दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here