जळगाव – बंद दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून बॅटऱ्या चोरी करून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे. अजमदउल्ला अमानतउल्ला खान (रा. पिंपळगाव राजा ता. खामगाव जि बुलढाणा) आणि सैय्यद दानिश सैय्यद ईसमाईल रा. घोडेगाव ता तेल्हारा जि अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असलेल्या चौधरी बॅटरी ट्रेडिंग या दुकानात रात्रीच्या वेळी हा चोरीचा प्रकार झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 31 हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅटऱ्या आणि 6 लाख रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस उप निरिक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर, पो ना प्रदीप चौधरी, पो कॉ सिध्देश्वर डापकर, रतन गिते, योगेश बारी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.