जळगाव – आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त कारवाईत भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरील एसी डब्यात चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांखाली कारवाई करण्यात आली आहे.
21 मे रोजी रेल्वे पोलिसांनी हावडा-सीएसएमटी मेल (12322) या गाडीत चोरी करणाऱ्या तिघांना संशयास्पद अवस्थेत अटक करण्यात आली. त्यांनी एसी डब्यात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर मुसाफिरखान्यात त्यांचे आणखी तिघे साथीदार चोरटे ताब्यात घेण्यात आले. यापैकी दोघा जणांनी एप्रिल महिन्यात पंधरा हजारांची चोरी केल्याचे कबुल केले. अटकेतील एकाविरुद्ध ‘चॅप्टर केस’ दाखल आहे.
गिरिजा शंकर बाबूलाल शर्मा (वय 71, रा. नेपानगर), लक्ष्मीनारायण दयाराम बागरी (वय 59), रवी लक्ष्मीनारायण बागरी (वय 25, दोघे रा. कामलीखेड़ा, उज्जैन), विनोद राधेश्याम बागरी (वय 35), महेंद्र देवकरण यादव (वय 22, दोन्ही रा. सोनकच्छ, देवास, राजू निम्बा खैरनार (वय 60, रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. लोहमार्ग पोलिस निरीक्षक सुधीर धायरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ पथकाने ही संयुक्त कारवाई केली.