जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): सना दिसायला देखणी होती. विशीतच सनाचे लग्न तिच्यापेक्षा दहा वर्षाने मोठ्या असलेल्या तिशीतील अजीज सलीम शेख या तरुणासोबत झाले होते. सना आणि अजीज हे दोघेही तसे अशिक्षीत होते. त्यामुळे दोघे मोलमजुरी करुन आपला संसार चालवत होते. जिकडे काम मिळेल तिकडे दोघे पती पत्नी मजुरीने कामाला जात होते. अजीज हा मुळचा पुणे जिल्ह्याच्या मोशी येथील रहिवासी होता. सना आणि तिचे आई वडील व इतर नातेवाईक हे बिड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ येथील रहिवासी होते. पुणे जिल्ह्यातील अजीजचे बिड जिल्ह्यातील सनासोबत समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. सना आणि तिचे आई वडील, भाऊ, वहिणी यांच्यासह अजीज हा देखील जिकडे काम मिळेल तिकडे मजुरीने जात होता. कामाच्या ठिकाणी वस्तीवरच दोघे रहात होते. गेल्या काही वर्षापासून हे सर्वजण जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव या गावी विट भट्टीवर कामाला आले होते.

भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या वरणगाव या गावी शेकडो विट भट्ट्या असून त्यावर अनेक मालक आणि मजुरांचा चरितार्थ चालतो. वरणगाव येथे शेकडो विट भट्ट्या असण्याचे कारण म्हणजे भट्टीसाठी लागणारी राख आणि कोळसा याठिकाणी सहज उपलब्ध होतो. भुसावळ आणि वरणगाव दरम्यान दिपनगर हे थर्मल पॉवर स्टेशन आहे. या ठिकाणी विजेची निर्मिती होते. या थर्मल पॉवर स्टेशनला विज निर्मीती करण्यासाठी कोळश्याची गरज भासते. त्यामुळे याठिकाणी रेल्वेने कोळसा येतो. रेल्वेने येणा-या कोळश्याची या परिसरात चोरी होत असल्याचे चित्र कित्येकदा दिसून येते. रेल्वे यार्डात अथवा आऊटरला रेल्वेच्या वॅगन थांबल्या म्हणजे या गाड्यांच्या वॅगनचे दरवाजे उघडून रेल्वे आरपीएफसोबत मिलीभगतच्या माध्यमातून चोरुन लपून अथवा खुलेआमपणे कोळश्यांची चोरी आणि विक्री होत असल्याचे म्हटले जाते. कोळसा आणि राख या दोघांचा वापर परिसरातील विट भट्ट्यांवर आणि कोळशाचा वापर ढाब्यांवर होतो.

सना आणि अजीज हे दोघे पती पत्नी विट भट्टीवर काम करुन आपला चरितार्थ भागवत होते. विट भट्टीवर जड काम केल्याने अजीजला सायंकाळी थकवा येत असे. थकवा घालवण्यासाठी त्याचे पाय आपसुकच दारु अड्ड्याच्या दिशेने वळत असत. ज्या भागात श्रमीक वर्ग राहतो त्या भागात साहजीकच दारुचे अड्डे देखील असतात हे व्यवसायाचे गणीत आणि चित्र राज्यासह देशात सर्वत्र दिसून येते. वरणगाव परिसरात विट भट्ट्या असल्यामुळे साहजीकच या भागातील श्रमीक वर्गाच्या श्रम परिहारासाठी दारुच्या अड्ड्यांचा छुप्या मार्गाने धुमाकुळ सुरु असतो.
सायंकाळी विट भट्टीवरील काम आटोपून घरी परतणारा अजीज दारु पिऊनच घरी येत होता. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर नाराज रहात होती. दारु अर्थात मद्य प्राशन केल्यानंतर घरी आलेला अजीज काहीतरी कुरापत काढून पत्नी सना सोबत वाद घालत असे. लग्नाच्या वेळी विशीतील सना आता पंचविशीची झाली होती. पंचविशीतील सना चार मुलांची आई झाली होती. चार मुलांची आई असली तरी सनाचे पंचविशीतील तारुण्य अबाधित होते. तिचे तारुण्य दिवसेंदिवस खुलत होते. त्यामुळे साहजीकच आपल्या पत्नीवर कुणाची तरी नजर पडत असावी अशी शंका अजीजला येत होती असे दोघांमधील नेहमीच्या वादाच्या निमीत्ताने म्हटले जात होते. कदाचीत त्या कारणामुळे तो पत्नी सनासोबत मद्यप्राशन करुन वाद घालत होता असे देखील म्हटले जाते.


अजीज मद्यप्राशन करुन घरी आल्यानंतर होणा-या रोजच्या त्रासाला त्याची पत्नी सना वैतागली होती. गेल्या दोन वर्षापासून अजीज, त्याची पत्नी सना आणि तिचे आई – वडील, भाऊ असे सर्वजण वेल्हाळे शिवारातील शेतात पत्री शेडमधे शेजारी शेजारी रहात होते. सनाला अजीजकडून दररोज होणारी शिवीगाळ व प्रसंगी मारहाण बघून शेजारच्या खोलीत राहणारी तिची आई व भाऊ त्याला नेहमी समजावत असत. मात्र अजिजच्या वागण्यात काही बदल होत नव्हता. अजिजकडून तिला होणारा त्रास काही कमी झाला नाही.
दि. 22 मार्च 2025 रोजी नेहमीप्रमाणे सना, तिचा पती अजीज व तिचे आई वडील व भाऊ असे सर्वजण विट भट्टीवर कामाला गेले होते. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे हा मजुरांचा साप्ताहीक पगाराचा दिवस म्हटला जातो. या दिवशी हाती पैसे पडले म्हणजे मजुर बाजाराला जातात. सायंकाळी सहा वाजता अजीज व सनाचा भाऊ आणि इतर लोक वरणगाव येथे बाजार करण्यासाठी गेले. सनाचे भाऊ बाजार करत असतांना अजीज मात्र दारु पिण्यास बसला. त्यांनतर सर्वजण रात्री आपापल्या घरी परत आले. जेवण आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या जागी झोपण्यासाठी गेले.


नेहमीप्रमाणे सना आणी अजीज हे दोघे जण आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. अजीजने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. सनाचा ट्रॅक्टर चालक भाऊ अजहर याला झोप येत नव्हती. खोलीत गरम होत असल्यामुळे तो बाहेर मोकळ्या जागेत हवेशीर जागी त्याचा मोबाईल बघत लेटला होता. रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास अजीज त्याच्या खोलीतून त्याच्या लहान मुलीला घेऊन बाहेर आला. अजहर जागा असल्याचे बघून अजीजने त्याला “तु अजून झोपला नाही का”? अशी विचारणा केली. त्यानंतर अजीज पुन्हा त्याच्या खोलीत निघून गेला. त्यानंतर अजहर हा देखील पाणी पिल्यानंतर झोपी गेला.

दुस-या दिवशी 23 मार्चच्या सकाळी सात वाजेच्या सुमारास मात्र अजहरला विदारक चित्र बघण्यास मिळाले. सकाळी त्याला त्याची आई खाजाबी म्हणाली की सनाच्या खोलीचा दरवाजा बाहेरुन बंद असून रात्री तिच्या खोलीतून भांडणाचा मोठा आवाज येत होता. काहीतरी अघटीत झाले असावे असा खाजाबीला संशय होता. अजहर आणि त्याची आई खाजाबी अशा दोघांनी मिळून सनाच्या खोलीचा बाहेरुन बंद असलेला दरवाजा उघडून आत प्रवेश केला. खोलीत प्रवेश केल्यानंतर दोघांना ह्रदयद्रावक चित्र बघण्यास मिळाले.
सकाळी लवकर उठणारी अजहरची बहिण सना अंथरुणात सतरंजी पांघरलेल्या अवस्थेत पडलेली होती. आवाज देऊनही ती उठली नाही. तिने कोणताही प्रतिसाद अजहर अथवा तिची आई खाजाबी अशा दोघांना दिला नाही. दोघांनी तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती. अखेर दोघांनी तिच्या अंगावरील सतरंजी ओढली असता तिच्या दोन्ही नाकात चुन्याच्या पुड्या कोंबलेल्या दिसून आल्या. तिच्या दोन्ही नाकातून रक्त येत असल्याचे दोघांना दिसून आले. तिचे डोळे बंद अवस्थेत आणि गळ्यावर वळ उमटलेले दिसत होते.
सना मयत अवस्थेत दिसून येताच तिची आई खाजाबी जोरजोरात रडू लागली. सकाळी सकाळी खाजाबीचे जोरजोरात रडणे ऐकून आजुबाजूचे लोक त्याठिकाणी जमले. सनाचा पती अजीज याचा सर्वांनी शोध घेतला असता तो फरार झाला असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्याचा मोबाईल देखील स्विच ऑफ येत होता.
या घटनेची माहिती सर्वजण रहात असलेल्या शेताचे मालक किशोर डिगंबर पाटील यांनी पाहिली. त्यांनी या घटनेची माहिती वरणगाव पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव व त्यांचे सहकारी पो.कॉ. सुक्राम सावकारे, मनोहर बनसोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड, पोलिस उप निरीक्षक शरद बागल, पोलिस नाईक कृष्णा देशमुख आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई आणी तपासाला सुरुवात केली. काही वेळाने भुसावळ उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपासकामी अधिकारी व कर्मचारी वर्गाला सुचना दिल्या. या घटने प्रकरणी मयत सनाचा भाऊ अजहर नियाजोद्दीन शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिस स्टेशनला संशयीत अजिज शेख याच्यविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सनाचा मृतदेह स्थानिक वरणगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी सनाला मयत घोषित केले. त्याठिकाणीच सनाच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. सनाचा मृतदेह शव विच्छेदनकामी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. गळा आवळल्याने तिचा मृत्यु झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिका-यांकडून पोलिसांना मिळाला. या सर्व घडामोडी दरम्यान फरार संशयीत अजीज सलीम शेख याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास आणि फरार अजीज याचा समांतर शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.
गुप्त बातमीदार आणी तांत्रीक तपासाच्या माध्यमातून फरार अजीज शेख यास पुण्याच्या एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन हद्दीतून स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुणे येथून ताब्यात घेण्यात वरणगाव पोलिस स्टेशन आणी स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाला यश आले. सनाच्या गळ्याला पट्ट्याने आवळून आपण तिची हत्या केल्याचे त्याने कबुल केले. घरगुती वादातून आपण पत्नी सनाची हत्या केल्याचे अजीज याने पोलिस पथकाजवळ कबुल केले. मात्र या हत्येमागे चारित्र्याच्या संशयाचे कारण असल्याचे काही लोक खासगीत बोलत होते. या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव व त्यांचे सहकारी पो.कॉ. सुक्राम सावकारे तसेच मनोहर बनसोडे करत आहेत.