गळ्यात हार टाकून लग्नाचा देखावा केला गडावर — करिश्माला भोगून संदीपने सोडले तिला वा-यावर    

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): निसर्गाने करिश्माला रुपाची देणगी दिली होती. एखाद्या राजकुमारी प्रमाणे तिचे रुप होते. जन्मजात रुपाची खाण असलेल्या करिश्माचे सौंदर्य चार चौघात खुलून दिसत असे. ज्या कुणा तरुणासोबत तिचे लग्न होईल तो तरुण भाग्यशाली असेल असे तिच्या मैत्रीणी तिला खासगीत म्हणत असत. मात्र झाले उलटेच. जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव या तालुक्याच्या गावी राहणा-या एका तरुणासोबत तिचे लग्न झाले. तो तरुण अस्सल दारुड्या निघाला. तो दररोज मधुशाळेत अर्थात दारुच्या अड्डयावर नियमीत हजेरी लावत होता. करिश्मा सारखी देखणी. रुपवान पत्नी लाभली असतांना का कुणास ठाऊक तो देवदास बनला होता.

करिश्माचा पती दररोज नित्यनेमाने मधुशाळेत अर्थात दारुच्या अड्ड्यावर मद्य प्राशन करण्यास हजेरी लावत असल्याचे धरणगाव येथील एका तरुणाच्या निदर्शनास आले. संदीप धनगर असे त्या तरुणाचे नाव होते. मधुशाळेत नियमीत हजेरी लावणा-या करिश्माच्या पतीच्या सवयी संदीप धनगरला चांगल्या प्रकारे माहित झाल्या होत्या. करिश्मा दिसायला देखणी असल्याचे देखील त्याला माहिती होते. अति मद्यप्राशन करणारा करिश्माचा पती थोड्या दिवसांचा सोबती असल्याचे संदीपने ओळखले होते. अति मद्य प्राशन केल्याने करिश्माच्या पतीचे सन 2021 मधे लिव्हर खराब झाले होते. मद्यपी पतीपासून करिश्मा एका मुलाची आई झाली होती. एका मुलाची आई असलेल्या करिश्माने सौंदर्याचे शिखर सर केले होते. ती रुपाची खाण होती. तिच्या रुपावर भाळलेला संदीप धनगर तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून रहात होता.

तिन वर्षापुर्वी सन 2022 मधे धरणगावच्या काही महिला व काही पुरुष सप्तशृंगी गडावर पायी जाण्यास निघाले होते. महिलांच्या समुहात करिश्मा देखील सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी पायी जाण्यास सहभागी झाली होती. सप्तशृंगी गडावर जाणा-या पदयात्रेतील महिला व पुरुषांच्या समुहात संदीप धनगर हा देखील आवर्जून मुद्दाम उपस्थित होता. त्याचे कारण म्हणजे करिश्मा त्या पदयात्रेत सहभागी झाली होती.

सर्व महिला व पुरुष सप्तश्रृंगी गडावर पोहोचल्यानंतर काही वेळासाठी थांबले. त्याचवेळी संदीप धनगर हा त्याच्या मोबाईलमधे एक सेल्फी गृप फोटो काढण्यासाठी पुढे सरसावला. करिश्मा पुढे उभी असतांना तो मुद्दाम तिच्या शेजारी उभा राहिला आणि त्याने लगेच फोटो क्लिक केला. त्यानंतर समुहातील सर्व महिला आणि पुरुषांना सोडून संदीपने केवळ  करिश्मासोबत बोलण्याची नामी संधी साधली. आपल्या मोबाईलची चार्जिंग संपण्याच्या बेतात असून मला घरी बोलायचे आहे. मला तुमचा मोबाईल थोडा वेळ घरी बोलण्यासाठी हवा असे तो करिश्माला म्हणाला. करिश्माने देखील तिचा मोबाईल संदीपला बोलण्यासाठी दिला. मोबाईलवरील बोलणे आटोपल्यानंतर संदीपने करिश्माला तिचा मोबाईल परत दिला. त्यानंतर त्याने त्याची ओळख तिला करुन दिली. तसेच तिने देखील तिची ओळख त्याला करुन दिली. तेव्हापासून तिच्यासोबत बोलण्याची आणि तिच्यासोबत संपर्कात राहण्याची संदीपने एकही संधी सोडली नाही. तो तिच्यासोबत गप्पा करु लागला.

संशयित आरोपी संदीप धनगर

मी तुला खुप दिवसांपासून बघत असून माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी खुप दिवसांपासून तुझ्या मागावर आहे असे देखील त्याने तिच्याजवळ कबुल केले. तु मला खुप आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे संदीप तिला म्हणाला. त्यावर ती त्याला म्हणाली की माझे लग्न झाले असून मी एक विवाहीता आहे तसेच मला माझ्या पतीपासून एक मुलगा देखील आहे. त्यावर तो तिला म्हणाला की मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे. तुझा पती मद्यपी असून तो नेहमी आजारी राहतो आणी त्याला केव्हाही मरण येऊ शकते असे भाकीत देखील संदीपने तिच्याजवळ वर्तवले.

पती निधनानंतर तु एकटी पडशील त्यावेळी मी तुला पतीच्या रुपात साथ देणार आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणून त्याने तिचे प्रेम आणि तिची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला. आज माझा पती जिवंत असून मी एक विवाहीता आहे. मी आज त्याच्या नावाचे कुंकू लावले आहे. त्यामुळे मला तुझा प्रस्ताव मान्य नाही असे तिने त्याला सांगितले.

मात्र संदीप हार पत्करण्यास तयार नव्हता. तो तिला म्हणाला की तुझा माझ्यावर भरवसा नाही का? बघ मी आत्ताच याठिकाणी तुझ्या गळ्यात फुलांचा हार टाकून तुझ्यासोबत लग्न करतो. तिला काही कळण्याच्या आत त्याने फुलांचे दोन हार विकत आणले आणि एक हार तिच्या गळ्यात टाकला आणि दुसरा तिच्याकडून स्वत:च्या गळ्यात टाकून घेतला. अशा प्रकारे लबाडीने लग्न केल्याचे भासवून आता आपण पती पत्नी आहोत असे तो तिला म्हणाला. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाच्या बहाण्याने सामुहीक पदयात्रा करत आलेल्या संदीपने भुलथापा देत करिश्माच्या गळ्यात हार टाकून तिच्यासोबत फसवे लग्न केले होते.  

आपण एकमेकांसोबत लग्न केल्याचे आपल्याला दोघांनाच माहिती असून लवकरच गावक-यांच्या साक्षीने आपण पुन्हा रितसर लग्न करु असे त्याने तिला वचन दिले. ती देखील पती हयात असतांना सप्तशृंगी गडावर पदयात्रेत त्याच्या बोलण्यात बहकली. तुझा मद्यपी पती लवकरच जीवनयात्रा संपवणार असून त्याच्या पश्चात मी तुला पतीच्या रुपात सहारा देणार असल्याचे तो तिला पुन्हा म्हणाला.

दि. 10 एप्रिल 2022 रोजी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिला आणि पुरुष असे सर्वजण पुन्हा धरणगावी परत आले. त्यानंतर काही दिवसांनी करिश्माचा पती काही कामानिमीत्त नाशिकला गेला. करिश्माचा पती नाशिकला गेल्याची संधी साधत संदीपने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. माझ्या मोबाईलमधे आपले वरमाला घालतांनाचे फोटो असून आपण पती पत्नी आहोत. मी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी येतो. त्यावर करिश्मा त्याला म्हणाली की माझा पती सध्या हयात असून त्याच्या नावाचे कुंकू माझ्या कपाळावर लागले आहे. घराच्या सातबारा उता-यावरील नावाप्रमाणे पतीच्या नावाचा बोझा तिच्या कपाळावर असतांना संदीप तिच्यावर केवळ जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर पतीरुपी मालकी हक्क दाखवत होता.

त्याच रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास सर्व गाव साखर झोपेत असतांना हळूच चोर पावलांनी संदीप धनगर तिच्या घरी आला. त्याने तिच्या घराचा दरवाजा टकटक वाजवला. करिश्माने दरवाजा उघडताच तो धाडकन तिच्या घरात आला. तु कशाला आला? आपले रितसर लग्न झाले नसून मी आरडाओरड करेन अशी तिने त्याला तंबी दिली. मात्र संदीप हार पत्करणारा नव्हता. तु आरडाओरड केलीस तर मी आपले जोडीने काढलेले फोटो प्रसारित करेन आणि तुझी बदनामी होईल असा त्याने तिला दम दिला. त्यावर आपले समाजासमोर लग्न झालेले नसून अद्याप माझा पती जीवंत आहे असे ती त्याला सांगू लागली. मात्र त्याने तिचे काहीही ऐकून न घेता तिच्यासोबत शरीर संबंध निर्माण केले.

त्यानंतर संदिपला तिच्यासोबत शरीरसंबंध करण्याची जणू काही चटकच लागली. संधी साधून तो जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर आणि धाकावर तिच्यासोबत तिच्याच घरी शरीर संबंध करु लागला. त्यामुळे निसर्गाने आपले काम चोखपणे बजावण्यास सुरुवात केली. एकवेळ मनुष्य आपले काम विसरतो मात्र निसर्ग आपले काम विसरत नाही. निसर्गाने करिश्माला संदीप पासून गर्भवती करण्यास सुरुवात केली. तुझा नवरा लवकरच मरणार असून त्याच्या पश्चात मी तुझ्यासोबत लग्न करुन तुझा सांभाळ करणार आहे अशा भुलथापा देत तो तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करु लागला.  त्यामुळे आधी मुल होऊ देण्यास नकार देणारी करिश्मा आता संदीपपासून मुल होऊ देण्यास राजी झाली.

अशा प्रकारे गर्भवती करिश्माने तिचा पती जीवंत असतांना फेब्रुवारी 2023 मधे दुस-या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिन महिन्यांनी करिश्माच्या मद्यपी पतीचे उपचारादरम्यान निधन झाले. करिश्माच्या पतीचे निधन झाल्यानंतर आता संदीपला रान  मोकळे झाले होते. तो तिला अधुनमधून फोन पे च्या माध्यमातून खर्चासाठी पैसे देऊ लागला. तो हक्काने तिच्या घरी येऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होता.

पतीच्या निधनानंतर ती संदीपकडे हक्काचे लग्न करण्याची गळ घालू लागली. मात्र आता संदीप तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ताकास तुर लागू देत नव्हता. माझ्या बहिणीचे लग्न बाकी असून तिचे लग्न झाल्यानंतर आपण लग्न करु असे म्हणत तो वेळ मारुन नेत होता. मात्र एके दिवशी त्याने तिला स्पष्ट शब्दात नकारच दिला. मला दुस-या मुलीसोबत लग्न करायचे आहे असे म्हणत त्याने तिला त्याच्या घरी चर्चेसाठी बोलावले. ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली त्यावेळी त्याच्या बहिणी हजर होत्या. त्या सर्वांनी मिळून करिश्माला शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तु माझी पत्नी नाही आणि तुझा मुलगा देखील माझा नाही असे म्हणत त्याने तिच्यासोबत आपला काहीही संबंध नाही असे तिला धमकावत म्हटले.

अखेर करिश्माने धरणगाव पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यापुढे मांडली. पोलिस निरिक्षक पवन देसले यांनी तिची दर्दभरी दास्तान ऐकून घेत संबंधीत ठाणे अंमलदारास फिर्याद नोंदवून घेण्यास सांगितले. पिडीत करिश्माने दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 69, 81, 78, 115, 351 (1), 352 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पवार करत आहेत. (या कथेतील पिडीतेचे “करिश्मा” हे नाव काल्पनिक आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here