विश्वजीतसोबत चॅटींग करुन ऐश्वर्या पुरती फसली – शरीरसुखाच्या वाटेला जावून सर्वस्व गमावून बसली  

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): तरुण वय हे वाहत्या पाण्यात लपलेल्या खडकावरील शेवाळाप्रमाणे निसरडे असते. ज्याप्रमाणे पाण्यात लपलेल्या शेवाळावरुन कधी पाय घसरेल हे समजत नाही त्याप्रमाणे विशेषत: वयात आलेल्या मुलींचे पाय कधी घसरतील अर्थात  चुकीच्या मार्गाने कधी जातील हे सांगता येत नाही. त्याचे कारण म्हणजे हे अल्लड वय असते. या अल्लड वयाच्या मुलींचा कोण कसा गैरफायदा घेईल हे सांगता येत नाही. या वयात बुद्धी परिपक्व नसली तरी शरीर तारुण्याच्या उंबरठ्यावर परिपक्व होण्यासाठी उभे असते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.

ऐश्वर्या ही अवघी तेवीस वर्षाची वयात आलेली तरुणी जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी राहून शिक्षण घेत होती. तिला मोबाईल हाताळण्याचे वेड होते. मोबाईलवरील विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर विशेषत: इंस्टाग्रामवर ती अधिक सक्रिय होती. गेल्या वर्षी जून 2024 मधे ऐश्वर्याने तिच्या बहिणीच्या वाढदिवसाची स्टोरी इंस्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ठेवली. ती स्टोरी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील रहिवासी विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे या तरुणाने पाहिली. तेव्हापासून त्याने तिला मेसेजेस करुन तिचा मोबाईल क्रमांक मागण्यास सुरुवात केली.

सुरुवातीचे काही महिने ऐश्वर्याने त्याच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केले. मात्र विश्वजीतने वारंवार तिला मेसेजेस करुन तिच्या मोबाइल क्रमांकाची मागणी सुरुच ठेवली. अखेर ऐश्वर्याने तिचा मोबाईल क्रमांक अनोळखी विश्वजीत यास दिला आणि अल्लड वयात तिचा पाय एक प्रकारे घसरला असेच म्हणावे लागेल. तिचा मोबाईल क्रमांक मिळताच विश्वजीतने तिच्यासोबत बोलण्याचा सपाटाच सुरु केला.  

संशयित विश्वजित सिसोदे

सुरुवातीचे काही दिवस मोबाईलवर बोलणे झाल्यानंतर त्याने तिला प्रपोज करत तिला भेटण्याचा आग्रह धरला. बघता बघता ऐश्वर्याला आपल्यासोबत बोलण्यात गुंतवून ठेवण्यात तो हळूहळू यशस्वी झाला. ती देखील कमी अधिक प्रमाणात त्याच्यासोबत  बोलण्यात बहकली. ती त्याच्यासोबत मोबाईलवर चॅटींग देखील करु लागली. तो तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करु लागला. ती देखील त्याच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करु लागली. तिच्यासोबत झालेले चॅटींग त्याने हेतु पुरस्सर दुष्ट हेतूने त्याच्या मोबाईलमधे जतन करुन ठेवले. प्रत्येक वेळी तो तिला ती शिकत असलेल्या महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष भेटण्यासाठी आग्रह करु लागला.

माझा मावसभाऊ देखील मी शिकत असलेल्या महाविद्यालयात शिकत असून मी माझ्या आई सोबत राहते. त्यामुळे आपली भेट योग्य होणार नाही असे तिने त्याला फोन आणि चॅटींगच्या माध्यमातून बजावले. तरी देखील तो तिला भेटण्यासाठी आग्रह करु लागला. आपण एरंडोल येथे भेटू शकत नसल्यास पर्याय म्हणून जळगाव येथे हॉटेलमधे भेटू. जळगावला हॉटेलमधे आपल्याला कुणी ओळखणार नाही आणि आपल्या भेटीत व्यत्यय येणार नाही असे तो तिला म्हणू लागला.

एके दिवशी त्याने जळगाव एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलची रुम त्याच्या नावावर बुक केली. त्या हॉटेलमधे त्याने तिला बोलावले. एक तरुण एका तरुणीला हॉटेलच्या रुममधे एकांतात का बोलावतो हे ऐश्वर्याला न समजण्या इतपत ती दुधखुळी नक्कीच नव्हती. मात्र या अल्लड वयात पाय वाकडे पडण्याची आणि फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. ऐश्वर्याच्या बाबतीत नेमके हेच झाले. अल्लड बुद्धीच्या वयात शरीर परिपक्व होण्याच्या बेतात असतांना तिच्याकडून विश्वजीतला भेटायला जाण्याची घोडचुक झाली. यापुर्वी मोबाईलवर बोलण्याची आणी त्याच्यासोबत चॅटींग करण्याची देखील घोडचुक तिने केली होती.

रुममधे विश्वजीतने ऐश्वर्यासोबत जोडीने मोबाईलमधे फोटो काढले. गोड बोलून त्याने तिचा मोबाईल हाताळण्यास घेतला. दरम्यान ऐश्वर्या वाश रुममधे गेल्याची संधी साधून त्याने तिच्या मोबाईलचा क्युआर कोड स्कॅन करुन घेतला. त्यामुळे त्याने तिचा मोबाईल तीच्या नकळत हॅक केला. पहिल्या भेटीनंतर तो तिला वारंवार फोन करुन तिच्याशी संपर्क साधू लागला. मोबाईलवरील प्रत्येक संभाषणात तो तिला भेटीसाठी बोलावू लागला. ऐश्वर्याने त्याला भेटण्यासाठी नकार दिला म्हणजे तो तिच्यासोबत काढलेल्या फोटोचा शस्त्र म्हणून वापर करु लागला. तुझे माझ्यासोबत काढलेले फोटो आणि व्हाटस अ‍ॅप चॅटींग मी तुझ्या वडीलांना आणी नातेवाईकांना पाठवतो अशी तो तिला धमकी देऊ लागला. त्यामुळे नाईलाजाने ती त्याला त्याने बुक केलेल्या हॉटेलच्या रुममधे भेटण्यास जावू लागली.

गेल्यावेळी आपण सोबत काढलेले फोटो मी तुझ्या वडीलांना पाठवतो अशी धमकी त्याने तिला दिली. त्याच्या धमकीमुळे तीला रडू आले. या फोटो आणि चॅटींगच्या बळावर धमकी देत प्रसंगी गोड बोलून त्याने तिच्यासोबत शरीर संबंधाची मागणी केली. बळाचा वापर करुन त्याने तिच्यासोबत शरीर संबंध केले. यावेळी त्याने तिच्या नकळत लपून शरीर संबंधाचा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमधे शुट केला.

एवढे प्रताप कमी झाले म्हणून की काय त्याने ऐश्वर्या सोबत काढलेला फोटो त्याच्या व्हाटस अ‍ॅप डीपीला ठेवून तो तिच्या वडीलांच्या व्हाटस अ‍ॅपवर देखील पाठवला. त्याने तिला फोन करुन सांगितले की तिचा मोबाईल गेल्यावेळी हॉटेलमधे हॅक केला आहे. त्यामुळे तिच्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्ट माझ्याकडे असल्याचे देखील त्याने तिला सांगितले. त्याचे बोलणे ऐकून ती मनातून प्रचंड घाबरली. तुझ्या मोबाईल कॉन्टॅक्ट मधील सर्वांना मी आपले फोटो आणि व्हिडीओ पाठवतो अशी त्याने तिला धमकी दिली. त्यामुळे नाईलाजाने तिला त्याच्यासोबत बोलणे सुरु ठेवावे लागले.

आता तुला माझ्यासोबत लग्न करावे लागेल अशी नवीनच धमकी त्याने तिला देण्यास सुरुवात केली. मला तुझ्यासोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही असे तिने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले. मात्र तो जुमानण्यास तयार नव्हता. तो तिला म्हणाला की तु मला ओळखत नाही. माझा पुर्व इतिहास तुला माहिती नाही. मी एक गुन्हेगार आहे. लोक मला घाबरतात. माझ्यावर बुलढाणा जिल्ह्यात प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. मी कुणालाही घाबरत नाही. त्याचे बोलणे ऐकून ती प्रचंड घाबरली. त्यामुळे तिने तिचा मोबाईल क्रमांक कायमस्वरुपी बंद केला.

तिचा मोबाईल लागत नसल्यामुळे त्याने तिच्या वडीलांना फोन करुन माझे ऐश्वर्यासोबत बोलणे करुन द्या असे म्हणत त्यांना देखील धमक्या देण्यास सुरुवात केली. विश्वजीत याने ऐश्वर्याच्या वडीलांना तिचे आणि त्याचे जोडीने काढलेले फोटो व व्हिडीओ पाठवून काही वेळाने डीलीट केले. त्यानंतर देखील तो तिच्या वडीलांना फोटो आणी व्हिडीओची माहिती देत त्यांना धमक्या देऊ लागला. मी तुमच्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही, तुम्हाला फाशी घ्यायला लावेल अशा स्वरुपाच्या धमक्यांचे मेसेजेज बघून ऐश्वर्याचे वडील देखील वैतागले.

एवढे कमी झाले म्हणून की काय त्याने तिची आत्या आणि चुलत बहिण यांना देखील फोटो आणि व्हिडीओ पाठवून काही वेळाने डीलीट केले. अखेर वैतागून तिने या घटनेचा सोक्षमोक्ष लागण्यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची भेट घेत आपली व्यथा कथन केली. शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस उप निरीक्षक प्रिया दातीर यांच्या समक्ष पिडीत ऐश्वर्याची फिर्याद घेण्यात आली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत विश्वजीत सिसोदे याच्याविरुद्ध गु.र.न. 387/2025 भारतीय न्याय संहिता 64(1), 351(2), 351 (4), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अशोक काळे करत आहेत. (या कथेतील पिडीतेचे ऐश्वर्या हे नाव काल्पनिक आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here