लाचखोर मुख्याध्यापक पुन्हा लाचेच्या गुन्ह्यात

जळगाव : अगोदरच लाच स्विकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल असतांना पुन्हा लाच मिळवण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्याध्यापक एसीबीच्या कारवाईत अडकला आहे. संदीप प्रभाकर महाजन असे एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

या शाळेतील शिपायाला त्याच्या पत्नीचे 23 हजार 815 रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करायचे होते. हे बिल व्यक्तिगत पातळीवर ओळखीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षकांकडून मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी शिपायाकडे अगोदर पाच हजार रुपयांची मागणी केली.
याप्रकरणी शिपायाने जळगाव एसीबी कडे तक्रार केली. एसीबीच्या पडताळणीत मेडिकल बिलाच्या रकमेच्या 15 टक्क्याप्रमाणे 3600/-रुपयांची लाचेची मागणी करुन लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच मुख्याध्यापकाविरुद्ध यापुर्वी याच शिपायाकडून वेतन निश्चितीच्या 2,53,780/- रुपयांच्या फरकाचे पाच टक्क्याप्रमाणे 12500/- रुपयांची मागणी करुन दहा हजार रुपयांची लाच स्विकारली होती. याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला सन 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्याने लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकारणी कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here