नाशिक (क्राइम दुनिया न्युज नेटवर्क): गुगलवर पुरातन मंदिराचा शोध घेऊन यु ट्यूबवर हायड्रोलिक कटरच्या मदतीने कुलूप तोडण्याचे व्हिडीओ बघून विविध मंदिरात चो-या करणा-या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या दोघा साथीदारांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. अटकेतील तिघा चोरट्यांच्या दोघा फरार व निष्पन्न झालेल्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
अटकेतील तिघांकडून मंदीर चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 66 किलो वजनाच्या पितळी वस्तु व 1238 ग्रॅम चांदीच्या वस्तु हस्तगत करण्यात आल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या 1 लाख 93 हजार 290 रुपये किमतीच्या वस्तूमध्ये चांदीचा मुकुट, दोन चांदीच्या प्लेट, पितळी कळस, तीन मोठ्या समई, सहा पितळी घंटा, एक छोटी पितळी समई, एक पितळी घोडा आदींचा समावेश आहे.
सुयोग अशोक दवंगे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), संदिप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे (रा. टिटवाळा, सावरकरनगर, ओमकार सोसायटी चाळ, कल्याण) आणि अनिकेत अनिल कदम (रा. आरके नगर, स्टार बिल्डर चाळ, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी अटकेतील तिघा चोरट्यांची नावे आहेत. संदिप किसन साबळे (रा. सोमठाणे मंदिर, पाचपट्टा, अकोले, जि. अहिल्यानगर) आणि दिपक विलास पाटेकर (रा. टिटवाळा, माउलीकृपा चाळ, कल्याण, जि.ठाणे) अशी दोघा फरार चोरट्यांची नावे आहेत.
नाशिक जिल्हयातील सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडीव-हे आदी पोलीस स्टेशन हद्दीत मंदिरातील चोरीचे गुन्हे घडलेले गुन्हे या तपासातून उघडकीस आले आहेत. मंदिर चोरीच्या गुन्हयातील चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यांचे डिव्हीआर मशिन देखील चोरी करुन नेत होते. पुरातन मंदीरावर लक्ष केंद्रीत करून त्यातील चांदी व पितळी धातूंच्या किंमती वस्तू चोरी करुन नेत होते. मंदिर चोरीच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. रवींद्र मगर यांनी तपासाला गती दिली. पोलिस पथकाने घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने शोध घेतला. हे गुन्हे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस पथकाला समजली. पो. नि. रवींद्र मगर यांच्या पथकाने पुणे जिल्ह्याच्या चाकण एमआयडीसी व टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे परिसरातून तिघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांनी आपला गुन्हा कबूल करत मुद्देमाल काढून दिला.
अटकेतील चोरटा सुयोग अशोक दवंगे हा सराईत गुन्हेगार असून तो टोळी प्रमुख आहे. तो सध्या मॅकेनिकल इंजिनियरींगच्या दुस-या वर्षाला शिक्षण घेत होता. पोलिसांच्या ताब्यातील गुन्हेगार चोरटे हे गुगल मॅपवर ग्रामीण भागातील पुरातन मंदिरे सर्च करुन त्यांची पाहणी करून चोरी करत होते. तसेच यु टयुबवर कुलूप तोडण्याचे व्हिडीओ बघून हायड्रोलीक कटरच्या सहाय्याने कुलूप कट करत असल्याचे उघड झाले आहे. या आरोपींविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व नाशिक ग्रामीण जिल्हयात मालाविरुद्ध गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून मंदिर चोरीसह घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाडीव-हे पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सहायक फौजदार नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदिप नागपुरे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.