पाच हजाराची लाच घेणा-या कंत्राटी वायरमन विरुद्ध एसीबीची कारवाई

On: June 10, 2025 10:11 PM

जळगाव – वीज मीटरचे सील तुटले असून त्यात छेडखानी केल्याचा ग्राहकास धाक दाखवत वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासह वीज मीटर सुस्थितीत असल्याचा दाखला देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्विकारणारा कंत्राटी वायरमन एसीबीच्या कारवाईत सापडला. भुषण शालिग्राम चौधरी असे जळगावच्या प्रभात कॉलनी कक्षात नेमणूकीस असलेल्या या लाचखोर कंत्राटी वायरमनचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या राहत्या घराचे वीज मीटर हे पुर्वीच्या मालकाच्या नावे आहे. महावितरण तर्फे वीज मीटर बदलण्याचे काम सध्या चालू आहे. तीन दिवसापूर्वी वायरमन भुषण चौधरी तक्रारदार यांच्या घरी वीज मीटर बदलण्यासाठी आला. त्याने तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या वीज मीटरचे सील तुटलेले असून तुम्ही त्यात छेडछाड केल्याने तुम्हाला आर्थिक दंड होऊन तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल. वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वीज मीटर टेस्टिंग चा रिपोर्ट ओके देण्यासाठी वायरमन भुषण चौधरी याने तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची  लाचेची मागणी करत असल्याबाबत दि.10/06/2025 रोजी एसीबी कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली होती. 

या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता वायरमन चौधरी याने स्वतः साठी व मीटर टेस्टींग करणारे यांचेसाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. भुषण चौधरी यास ताब्यात घेण्यात आले असून रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकातील सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सफौ सुरेश पाटील, चालक पोहेकॉ सुनील वानखेडे, पोकाॅ अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम एन.सी.सी. या एजन्सीकडून विनामुल्य करण्यात येत आहे. त्यात नवीन स्मार्ट वीज मीटर बसवल्यानंतर जुने वीज मीटर महाविरण कार्यालयात जमा करण्यात येतात.

ज्युन्या वीज मीटर संदर्भात तकार नसल्यास जुन्या वीज मीटरची कोणत्याही प्रकारची टेस्टींग केली जात नाही. अगर आर्थिक दंड आकारला जात नाही. परंतु महाविरणचे काही कर्मचारी हे वीज ग्राहकांना तुमचे मीटर फॉल्टी आहे, सील तुटलेले आहे, टेस्टींगला पाठवावे लागेल, दंड भरावा लागेल, तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल असे खोटे सांगून वीज ग्राहकांकडुन मोठ्या प्रमाणात लाच घेत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव एसीबी कार्यालयाच्या वतीने सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते की अशाप्रकारे लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव येथे ०२५७ २२३५४७७ वर अथवा टोल फ्री कमांक १०६४ अथवा योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव यांचेशी ९७०२४३३१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment