घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड या कंपनीची लाखो रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी एकूण सात कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे शाखा व्यवस्थापक विठ्ठल खुशालराव नामपेल्लीवार यानी दिलेल्या फिर्यादीनुसार 16 लाख 35 हजार 626 रुपयांच्या फसवणूक प्रकरणी विविध कलमानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याने परिसरात खळबळ माजली आहे.
हर्षद राऊत (सातारा), दुर्गेश धापोडकर (पुलगांव), रितेश गुडपे (दहेली), मनोज आडे (सोनबर्डी), अखिल कोंडावार (खैरी), स्वागत मेश्राम (सोनबर्डी) व गजानन कर्दपवार (सायखेडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पूर्वीची इंडसइंड फायनान्शियल इन्क्लूजन लिमिटेड कंपनी आता भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीतील सातही कर्मचा-यांनी विविध कालावधीत अनेक सदस्यांची रक्कम कार्यालयात जमा केली नाही. सातही कर्मचा-यांनी फसवणूक केलेली रक्कम 16 लाख 35 हजार 626 रुपये आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे करत आहेत.