नाशिक : पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनचे धडाडीचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी आपला तपास कामाचा धडाका कायम ठेवला आहे. गुन्हा लहान असो वा मोठा तो शेवटी गुन्हा असतो ही थीम लाईन नजरेसमोर ठेवत पो. नि. दुर्गेश तिवारी तपास काम करत असतात. याकामी त्यांना सहकारी अधिकारी – कर्मचारी वर्गाची नेहमीच साथ लाभत असते.
पिंपळगाव बसवंत परिसरातील वनी रोड अंबिका नगर भागातील जनेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला गेली होती. गुरुवारी पहाटे मंदिरात आरतीसाठी आलेल्या भाविकांना मंदिराचे कुलूप तुटलेले आढळले. तसेच मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. भाविकांनी लागलीच या चोरीच्या घटनेची माहिती मंदीर समितीला दिली. मंदीर समितीने क्षणाचाही विलंब न करता पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची भेट घेत या चोरीची घटना कथन केली.
पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या पथकातील विकास वाळुंज, निलेश जाधव, नितीन गाढवे, अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. या तपासात पाचोरे वणी नेत्रावती नदी पात्रात चोरी झालेली दानपेटी तपास पथकाला आढळून आली. अधिक तपासात खब-यांच्या मदतीने हा गुन्हा परिसरातील चोरट्यांनी केल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून परिसरातील तिघा चोरट्यांना ताब्यात घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.
ताब्यातील तिघांकडून चोरी झालेल्या दानपेटीतील काही रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात अजून एका साथीदाराचा सहभाग असून दानपेटीतील उर्वरित रक्कम त्याच्याकडे देखील असल्याची कबुली ताब्यातील तिघांनी पोलिसांना दिली.
चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व रक्कम हस्तगत करण्यात आली. या गुन्ह्यातील फरार चौथ्या चोरट्याच्या मागावर पोलिस पथक असून लवकरच त्याला देखील ताब्यात घेतले जाणार असल्याचे पो. नि. दुर्गेश तिवारी यांनी म्हटले आहे. दानपेटी फोडणाऱ्या चौघांविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश जाधव करत आहेत. अवघ्या चार तासात या गुन्ह्याचा तपास लागल्याने पो. नि. दुर्गेश तिवारी व त्यांच्या सहका-यांचे कौतुक होत आहे. पोलिसांच्या या तपास कामाबद्दल जनेश्वर महादेव मंदिर समिती तसेच जय बाबाजी भक्त परिवार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
या घटनेच्या निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराचे मार्गदर्शक रामराव डेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज असून भविष्यात असे गुन्हे घडणार नाही यांची दक्षता घेण्याची गरज असल्याची भावना त्यांनी अटकेतील चोरट्यांच्या पालकांकडे व्यक्त केली. महादेव मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, मनोज शेवरे, दत्तात्रेय धाडीवाल, विजय जाधव, नाना कुमावत आदी यावेळी उपस्थित होते.