जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): सामान्य अथवा अशिक्षीत परिवारात जन्माला येणे हा नशिबाचा भाग म्हणता येईल. मात्र अशिक्षीत आणि सामान्य जीवन जगायचे की शिक्षीत, सुसंस्कृत आणि सन्मानपुर्वक जीवन जगायचे हे मात्र आपल्या हाती नक्कीच असते. शिक्षणाची संधी मिळत असतांना ती नाकारणे अथवा शिकण्याची मानसिक तयारीच अंगी नसणे हे मात्र चुकीचे ठरते. किमान सुसंस्कृत आणि समाधानी जीवन जगण्याइतपत तरी शिक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे. ग्रामीण भागातील बस स्थानकावर, चावडीवर, एखाद्या कट्टयावर अथवा पानटपरीवर काही रिकामटेकडे तरुण बराचवेळ रिकामटेकड्या गप्पा करत असल्याचे चित्र कित्येकदा दिसून येते. जाणा-या येणा-यांची टिंगलटवाळी करण्याचे काम ग्रामीण भागातील काही तरुण करत असतांनाचे दृश्य नजरेस पडते.

जीवनातील मोलाचे क्षण आपण विनाकारण घालवत असल्याचा विचार अशा तरुणांच्या मनात येत नाही. शिक्षण आणि संस्कृतीचा अभाव हे या मागचे मुख्य कारण म्हणता येऊ शकते. याउलट शहरी भागातील तरुणांकडे फारसा रिकामा वेळ नसतो. प्रत्येकाला आपल्या नियोजीत स्थळी जावून आपले काम पुर्ण करण्याची घाई असते. वेळ किती मौल्यवान आहे हे मुंबईच्या उप नगरीय रेल्वेतील गर्दीचे चित्र बघून आपल्या लक्षात येते.
साहील मुकद्दर तडवी, राकेश बळीराम हातागडे आणि राजेश अनिल हातागडे हे तिघे रिकामटेकडे तरुण होते. पाचोरा तालुक्यातील शेवाळे या गावी राहणारे हे तिघे तरुण अठरा ते एकवीस या वयोगटातील होते. रस्त्याच्या कडेला बसून येणा-या जाणा-यांची टिंगल टवाळी करणे हा तिघांचा उद्योग होता. चांगले शिक्षण घेऊन किमान सुसंस्कृत आणि उद्योगी होण्याची या तिघांची मानसिक तयारी नव्हती.

तिघे तरुण रहात असलेल्या पाचोरा तालुक्यातील शेवाळे या गावी जनाबाई महारु पाटील ही 85 वर्ष वयाची वयोवृद्ध महिला रहात होती. जनाबाईचे वय 85 असल्यामुळे ती तरुणांसाठी आजी होती. आजी जनाबाईचे पती महारु पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक होते. महारु पाटील यांच्या निधनानंतर जनाबाईंना दरमहा निवृत्ती वेतन मिळत होते. त्या वेतनातून मिळणा-या पैशांची बचत करुन त्यांनी दागदागिने तयार करुन घेतले होते.
जनाबाई या एकट्याच मातीच्या घरात रहात होत्या. त्यांच्या मातीच्या घराशेजारीच त्यांचा मुलगा कृष्णा महारु पाटील हा दुमजली घरात परिवारासह राहतो. जनाबाईंच्या देखभालीसह त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था त्यांचा मुलगा कृष्णा करत होता. जनाबाई रहात असलेल्या घराच्या ओट्यावर साहील मुकद्दर तडवी, राकेश बळीराम हातागडे आणि राजेश अनिल हातागडे हे तिघे तरुण नेहमी बसलेले असायचे. साहिल आणि राकेश हे दोघे एकविस वर्षाचे तर राजेश हा अठरा वर्षाचा होता. कामधंदा नसल्यामुळे तिघे जण तसे रिकामेच होते. येणा-या जाणा-या लोकांची टिंगल टवाळी करणे हा त्यांचा बिनपगारी उद्योग होता. छोट्या पडद्यावर कपील शर्मा हा व्यावसायीक कलाकार त्याच्या शो मधे लोकांची टिंगल टवाळी करुन पैसे कमावण्याचा उद्योग करतो. शेवाळे गावातील हे तिघे तरुण नाहक लोकांची टिंगल टवाळी करत होते.

वयोवृद्ध जनाबाईची देखील हे तिघे टिंगल टवाळी करत असत. तिघा रिकामटेकड्या तरुणांचे जेवढे वय होते त्यापेक्षा कितीतरी पटीने आणि तुलनेत जनाबाईचा आजवरच्या जीवनाचा अनुभव होता. आजीसमान जनाबाईची टिंगल टवाळी करण्यात तिघांना सुख वाटत होते. त्यामुळे वयोवृद्ध जनाबाईंना त्यांचा राग येत होता. त्या रागातून प्रसंगानुरुप जनाबाई तिघांना शिवीगाळ करण्यास प्रवृत्त होत असत. तिघांना जनाबाईकडून शिवीगाळ झाली म्हणजे तिघे तरुण त्यांची अजूनच मजा घेत होते. एकंदरीत हा अतिशय चुकीचा प्रकार तिघा रिकामटेकड्या तरुणांकडून सुरु होता. एके दिवशी संतप्त जनाबाईने तिघांना अतिशय कडक शब्दात तंबी दिली. जनाबाईचा रुद्रावतार बघून तिघे तरुण त्यावेळी स्तब्ध झाले. मात्र तिघांनी जनाबाईच्या अंगावरील दागिन्यांची ओरबाडून चोरी करुन त्यांचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. मनाशी निश्चित केलेल्या कटानुसार तिघेजण संधीची तिघेजण वाट बघू लागले. जनाबाईच्या अंगावरील दागिन्यांची ओरबाडून चोरी करुन हत्या करण्याचा अघोरी विचार तिघांच्या मनात घर करुन बसला.

गुरुवार दि. 5 जून 2025 रोजी जनाबाईंचा मुलगा कृष्णा याच्या मित्राच्या मुलाचा पाचोरा येथे वाढदिवस होता. त्यामुळे कृष्णा हा त्या दिवशी रात्री पाचोरा येथे गेला होता. नेमकी हिच संधी तिघा टवाळखोरांनी साधली. रात्री दहा – साडेदहा वाजेच्या सुमारास तिघांनी जनाबाईच्या घरात मागच्या दरवाजाने प्रवेश केला. धारदार विळीने त्यांनी वयोवृद्ध जनाबाईवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. धारदार विळीने जनाबाईच्या कानाच्या नाजूक पाळ्या कापून त्यातील सोन्याच्या बाळ्या निर्दयीपणे ओरबाडून घेण्यात आल्या. 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, कानातील बाळ्या, कुरडू व सोन्याचे मनी हिसकावून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात वयोवृद्ध जनाबाईंने अखेरचा श्वास घेतला. जनाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून त्यांना घरातील पलंगाखाली लोटून त्यांच्या अंगावर पांघरुण टाकून देण्यात आले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तिघांनी घटनास्थळावरुन पलायन केले.
त्यानंतर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मित्राच्या मुलाचा वाढदिवस आटोपून जनाबाईंचा मुलगा कृष्णा हा शेवाळे गावी परत आला. आल्यानंतर तो आई जनाबाईची भेट घेण्यासाठी आला असता त्याला भयावह दृष्य नजरेस पडले. कृष्णाची आई जनाबाई या पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या अंगावर पांघरुण टाकून मारेकरी पसार झाले होते. त्यांच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे आणि कानाच्या पाळ्या कापल्याचे भयानक दृश्य नजरेस पडल्यानंतर कृष्णा घाबरला.

कृष्णाने आरडाओरड केल्यानंतर आजुबाजूचे रहिवासी त्याठिकाणी धावत आले. या घटनेची लागलीच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच स्थानिक पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. मयत जनाबाई यांचा मुलगा कृष्णराव महारु पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार या घटने प्रकरणी पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन गु. र. नं. 151/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 311, 332 अ प्रमाणे 6 जून 2025 रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी एलसीबी पथक, डॉग स्कॉड व फॉरेंसिक पथक दाखल झाले. अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, डिवायएसपी धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी एलसीबीचे पो.नि. संदीप पाटील व पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांना तपासकामी मार्गदर्शक सुचना दिल्या.
गुप्त बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला. हा गुन्हा स्थानिक तरुणांनी केला असल्याचा अंदाज बांधण्यात आला. हा गुन्हा उघडकीस आल्यापासून व दाखल झाल्यानंतर गावातील साहील मुकद्दर तडवी, राकेश बळीराम हतागळे आणि राजेश अनिल हतागळे हे तिघे स्थानिक टवाळखोर तरुण गावात दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरील पोलिसांचा संशय अजूनच बळावला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या मदतीने हुडकून काढण्यात आले.
त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. मयत जनाबाई महारु पाटील रहात असलेल्या घराच्या ओट्यावर तिघे तरुण टिंगल टवाळ्या करत बसायचे. त्याचा जनाबाईंना राग येत असे. त्यामुळे त्यांनी तिघांना करड्या आवाजात चांगलेच खडसावले होते. त्याचा तिघा तरुणांना राग आला होता. त्या रागाच्या भरात त्यांनी रात्रीच्या वेळी एकट्या राहणा-या जनाबाईंच्या घरात मागच्या दाराने जावून धारदार विळीने त्यांच्या कानाच्या पाळ्या कापून कानातील दागिने ओरबाडून घेतले. विळीने त्यांच्या अंगावर प्राणघातक हल्ला केल्याचे त्यांनी पोलिस पथकाजवळ कबुल केले. अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्यांची हत्या केल्यानंतर तिघांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पलायन केले.
अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 11 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान साहिल मुकद्दर तडवी याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार विळी, 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, कानातील बाळ्या, कुरडू, सोन्याचे मनी तसेच गुन्हा करतांना वापरलेले कपडे आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटकेतील तिघे संशयीत आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
शिक्षणाचा आणि सुसंस्कृतपणाचा अभाव असल्यामुळे तिघा तरुणांकडून जनाबाईंचा संतापात खून झाला. मात्र खूनाचा प्रकार केल्यानंतर आपले पुढचे भवितव्य काय राहील? याचा साधा आणि सरळ विचार त्यांच्या मनात आला नाही. केवळ संताप आला आणि संयम हरवला म्हणून त्यांनी खूनाचा प्रकार केला. मात्र खून केल्यामुळे आपल्या जीवनाचे महत्वाचे क्षण जेलमधे जातील. याचा विचार त्यांच्या मनात आला नाही. जेलमधून सुटून आल्यानंतर देखील समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहील. आपले लग्नाचे वय असतांना आपल्याला वधू मिळेल का? याचा देखील साधा विचार त्यांच्या मनात आला नसेल का? असे अनेक प्रश्न या घटनेच्या निमीत्ताने उपस्थित होतात. या घटनेनंतर पोलिस त्यांचे तपासकाम करतील, समाज आपले दैनंदीन कामकाज करेल. मात्र आपला कुणी विचार करेल का? आणी केल्यास किती दिवस करतील हा विचार या तरुणांनी घटनेपुर्वी केला असता तर त्यांचे भवितव्य कदाचित सुखाचे राहीले असते हे निश्चित.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप पाटील, पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, शरद बागल, पोलिस उप निरीक्षक विठठल पवार, श्रेणी पोलिस उप निरिक्षक प्रकाश पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, चालक पोहेकॉ भरत पाटील, महेश सोमवंशी, पिंपळगांव हरेश्वर पोलिस स्टेशनचे पोहेकॉ नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, चापोकॉ सागर पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे करत आहेत.