घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात स. पो. नि. संदीप नरसाळे यांनी यश मिळवले आहे. पारवा पोलिस स्टेशनला अल्प मनुष्यबळ लाभले असतांना त्यांनी हद्दीतील 102 गावांमध्ये वेळोवेळी गांवक-यांच्या भेटी, शांतता समितीची वेळोवेळी बैठक, गुन्हेगारांवर वचक आदी उपक्रम राबवून शांतता प्रस्थापित केली आहे. हे त्यांच्या योग्य प्रशासनाचे गमक म्हटले जात आहे.
घाटंजी तालुक्यातील पारवा हे गांव आदिलाबाद (तेलंगणा) , आंध्रप्रदेश व नांदेड (मराठवाडा) सीमेलगत असलेले एक महत्त्वाचे ठिकाण आहे. 102 गावांची वस्ती असलेल्या या पोलिस स्टेशन हद्दीत आदिवासी व इतर समाज घटकांचा रहिवास आहे. पारवा, सावळी (सदोबा), कुर्ली, घोटी, चिखलवर्धा, माळेगांव, इचोरा, दातोडी अशी अनेक गांवे पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात. पारवा पोलिस स्टेशन हद्दीत मात्र सत्तर किलो मीटर लांब अंतरावर मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत इचोरा ही गाव वसलेले आहे. पोलिस प्रशासनाचे या गाव परिसरात वलय प्रस्थापित होण्यासाठी शासनाने आर्णी तालुक्यातील सावळी (सदोबा) येथे पोलीस दूरक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
पारवा पोलीस स्टेशनला सद्यस्थितीत दोन पोलिस उप निरीक्षक आणि 27 कर्मचारी कार्यरत आहेत. पाच बीट व एक उपकेंद्राचा यामध्ये समावेश आहे. सावळी (सदोबा) सर्कलमध्ये केवळ सहा ते सात कर्मचारी कार्यरत असून त्याठिकाणी पोलिस उप निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात आला आहे. एवढ्या कमी मनुष्य बळातही काही कर्मचारी साप्ताहिक, काही वैद्यकीय तर काही आकस्मिक रजेवर जात असतात. तशाही परिस्थितीत या पोलिस स्टेशनचा गाडा सुरु आहे. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिस दलात कमी अधिक प्रमाणात कायम आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेली जीर्ण रहिवासी वसाहतीच्या नुतणीकरणासाठी स.पो.नि. नरसाळे यांची मागणी असून त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.