वडीलांची हत्या करुन मुलाने केले त्यांना गार ! बनाव करण्यासाठी घाटात सोडून दिली कार !!

पुणे : शिरुर तालुक्यातील करडे घाटात गेल्या कित्येक दिवसांपासून एक निळ्या रंगाची बेवारस कार पडून होती. अखेर पोलीस तपासात या कारचं रहस्य समोर आले. एका मुलाने त्याच्या ताब्यातील कार त्याच्या वडिलांच्या हत्येसाठी वापरली होती. वडिलांच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने मृतदेहाची विल्हेवाट लावून करडे घाटात ही कार त्याने सोडून दिली होती.

पारनेर तालुक्याच्या निघोज येथे कुकडी नदीपात्रात एका पत्र्याच्या कोठीत 27 ऑगस्ट रोजी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला होता. अज्ञात व्यक्तीचा खून केल्यानंतर मृतदेह पेटीत घालून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने कुकडी नदी पात्रात टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी दामु धोंडीबा घोडे (माजी सरपंच, टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी पारनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

पारनेर पोलिसांना 11 सप्टेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला मृतदेहाच्या वर्णनाशी मिळती-जुळती मिसिंग दाखल असल्याची माहिती मिळाली. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमधून माहिती घेतली असता सतिश सदाशिव कोहकडे (49) , रा. कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे हे गृहस्थ 25 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची नोंद आढळून आली.

पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता व त्यांन मयताचे कपडे, करदोडा, हातातील दोरा व घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तूंचे फोटो दाखवले असता नातेवाईकांनी मयत हा मिसिंग असल्याचे तात्काळ ओळखले. या प्रकरणी धागेदोरे मिळताच तपास चक्रे फिरवून मयताच्या मुलाची चौकशी करण्यात आली.
सुरुवातीला आरोपी मुलाने माहिती देण्यास टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. वडील आईला चांगली वागणूक देत नव्हते. घरभाड्याचे व शेत मालाचे सर्व पैसे ते अनैतिक संबंध असलेल्या परक्या महिलेवर उधळत होते. या कारणावरुन आरोपी मुलाचे त्याच्या वडीलांशी सतत वाद सुरु होते.

23 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचे वडीलांशी नेहमीप्रमाणे वाद झाले. आईला मारहाण केल्याचा राग मनात धरुन आरोपी मुलगा प्रदीप सतिश कोहकडे याने त्याचे, मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही रा. कारेगांव) यांच्यासह इतर दोघा अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरातच मयताच्या डोळ्यात मीरचीची पूड टाकून, तोंड दाबून, कापडी पट्टयाने गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे कबुल केले.

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्या वडिलांचा मृतदेह कारमध्ये टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन वाहत्या पाण्यात फेकून दिला. त्यानंतर बनाव करत त्याच्या ताब्यातील कार शिरुर तालुक्यातील करडे येथील घाटात खाली दरीत सोडून दिली. त्यानुसार आरोपी मुलासह त्याचे मित्र व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here