पद्मालय शिवारातील महिलेच्या खूनाचा उलगडा 

On: February 6, 2026 8:28 PM

जळगाव – एरंडोल पोलिस स्टेशन हद्दीतील पद्मालय जंगल परिसरात आढळून आलेल्या महिलेच्या जळीत मृतदेहाच्या खूनासंदर्भात उलगडा झाला असून संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा.पहूर ता. जामनेर) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. प्रेम संबंधातून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. 

दिनांक ०४/०२/२०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास पद्मालय वनपरिक्षेत्रात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख मिटवण्यासाठी संबंधित मारेकऱ्याने चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून पूर्णपणे जाळला होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुरनं. १६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३ (१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव जिल्हयातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह विद्रूप अवस्थेत असल्याने ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. तसेच डोगराळ परिसर व घनदाट जंगल असल्याने मानवी वर्दळ नसल्याने सदरचा मृतदेह हा कुणाच्या निदर्शनास येणार नाही अशा परिस्थतीत निर्जन स्थळी मृतदेह पडून होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची चार पथके तयार करण्यात आली होती. अत्यंत कौशल्याने तपास करून अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला असून संशयित आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुर्नी’ हे तपासकामी ओळखीचे मुख्य धागे ठरले. फॉरेन्सिक तज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या (Maggots) वाढीवरून मृत्यूचा काळ ३० किंवा ३१ जानेवारी (शुक्रवार/शनिवार) असल्याचे निश्चित केले.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तसेच घटनास्थळावरील भौतीक व वस्तूजन्य पुरावा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा.पहूर ता. जामनेर) यास ताब्यात घेतले आहे. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार छत्तीसगढ राज्यातील रहिवासी मयत महिलेसोबत असलेल्या प्रेमसबंधाच्या वैयक्तिक वादातून आणि रागाच्या भरात डोक्यात प्रहार करून ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावरील कपडे काढून मोटार सायकल मधील पेट्रोल काढून ते मृतदेहावर टाकून जागीच जाळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्यातून तिचा मृतदेह अर्धवट जळाला होता अशी संशयित आरोपीने कबुली दिली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, पहूर पो.स्टे. चे पोलीस अंमलदार विनोद सुभाष पाटील तसेच स्थानिक गुन्हा शाखा जळगांवचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या या कामागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment