जळगाव : शासनाच्या भुसंपादीत जागेची मालक असल्याचे भासवून शासनाकडून 16 लाख 97 हजार 326 रुपये फसवणूकीने बॅंक खात्यात मिळवणा-या महिलेस जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. 324/25 भा.द.वि. 420, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनंदा मोतीलाल पाटील (रा.ज्ञानेश्वर नगर देवळाली पाथर्डी रोड नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
सुनंदा पाटील या महिलेने मौजे नशिराबाद तालुका जळगाव येथील जागेचे खोटे कागदपत्र सादर करुन त्या जागेचे आपणच मालक असल्याचे भासवून शासनाची रक्कम स्वत:च्या बॅंक खात्यावर आरटीजीएस च्या माध्यमातून मिळवली होती. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख, हे.कॉ. महेश महाजन, पोकॉ ईश्वर लोखंडे, प्रशांत लाड, चंद्रकांत पाटील, छाया पाटील, वैशाली सादरे आदींनी या गुन्ह्याचा तपास केला. पुढील तपास फौजदार गोपाल देशमुख करत आहेत.








