जळगाव – न्यायालयाने पत्नीला खावटी देण्याचा आदेश दिल्याचा राग मनात धरुन पत्नी व तिची आई रहात असलेल्या घरावर पेट्रोल टाकून ते पेटवणाऱ्या संशयितासह सुत्रधार पतीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या खळबळजनक घटनेचा उलगडा केला आहे. फिर्यादी महिलेचा पती या घटनेमागचा सुत्रधार असल्याचे वास्तव पुढे आले आहे. अटकेतील सुत्रधार पतीचा साथीदार हा मोटरसायकल चोरटा असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या नऊ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे जाळपोळीसह दहशत निर्माण करणारी घटना घडली होती. राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) असे अटकेतील फिर्यादी महिलेच्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गु.र.नं. 57/2026 भारतीय न्याय संहिता कलम 326 (ग) नुसार हा गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी महिला तीच्या आईसह घरात झोपली असतांना तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने सुरुवातीला संशयित आरोपी गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली देताना आपला साथीदार समाधान बळीराम निकम याच्या मदतीने हे कृत्य केल्याचे त्याने मान्य केले. तपासात या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार फिर्यादी महिलेचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) असल्याचे वास्तव समोर आले.
राहुल पाटील व त्याची पत्नी यांच्यात न्यायालयीन वाद सुरु आहे. न्यायालयाने राहुल यास दरमहा वीस हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. त्याचा सूड घेण्यासाठी राहुलने दोघा साथीदारांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी एक लाख रुपये आगाऊ देऊन त्याने हे कृत्य घडवून आणले.
संशयित आरोपी गणेश पाटील याच्या सखोल चौकशीतून त्याने विविध जिल्ह्यांतून मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून एकूण नऊ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या तपासात पाचोरा, एमआयडीसी, भोकरदन (जि. जालना), शेगाव लोहमार्ग (संभाजीनगर), सलाबतपुरा (सुरत, गुजरात), बोदवड (जि. जळगाव) येथे दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे, अंमलदार लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, हेमंत पाटील, रतन गिते, जितू पाटील, ईश्वर पाटील, राहुल महाजन, सचिन घुगे, बाबासाहेब पाटील, दिनेश पाटील आणि सायबर सेलचे मिलिंद जाधव यांनी या तपास कामी सहभाग घेतला. अटकेतील गणेश बाबुराव पाटील व राहुल वसंतसिंग पाटील यांना पुढील तपासकामी पाचोरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक योगेश गणगे करत आहेत.






