हैदराबाद : तेलंगाणा पोलीस विभागातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरात जवळपास 70 कोटी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार उघड झाला आहे. मलकाजगिरी भागातील सहायक पोलिस आयुक्त नरसिम्हा रेड्डी असे या कारवाईतील अधिकाऱ्याचे नाव आहे.
सन 1991 मधे नरसिम्हा रेड्डी या अधिका-याने इन्स्पेक्टर पदावर आपली नोकरीची कारकिर्द सुरु केली होती. नंतर नरसिम्हा रेड्डी यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हैदराबाद, तेलंगाणा व आंध्र प्रदेशातील इतर भागात छापे टाकण्यात आले. या कारवाईत नरसिम्हा रेड्डी याच्या नातेवाईकांच्या घरांवर देखील छापे पडले.
नरसिम्हा रेड्डी या अधिका-याने गैरमार्गाने बेहिशेबी मालमत्ता जमा केली असल्याचे उघड झाले आहे. रेड्डी यांची मालमत्ता हुडकून काढण्यासाठी पोलिसांना तब्बल 20 ठिकाणी छापे टाकण्याची कारवाई करावी लागली. त्या कारवाईत करीमनगर, वारंगल आणि नालगोंडा येथील रेड्डीच्या नातेवाईकांच्या घरांचा समावेश आहे.
नरसिम्हा रेड्डी यास आज न्यायालयात हजर करण्यात आले. रेड्डी व त्यांच्या परिवरातील इतर सदस्यांचे बॅंकेतील लॉकर उघडण्यात येणार आहे. त्यातून आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिस अधिकारी असलेल्या रेड्डी यांनी हैदराबाद येथील नाचाराम, हबसीगुडा, गुडीमलकापूर यासह घाटकेसर परिसरातील जमिनीत मोठी गुंतवणूक केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. घाटकेसर परिसरात रेड्डी यांनी 33 एकर जमीन खरेदी केली होती. या शिवाय अनंतपूर जिल्ह्यात 55 एकर जमीन घेतली असल्याचे समोर आले आहे. नरसिम्हा रेड्डी यांची कमाई जमिनीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात सुरु होती. उप्पल येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असतांना अधिकारी असलेल्या रेड्डी यांचा हा उद्योग सुरु होता.