जळगाव : आजारपणामुळे झालेल्या मृत्युला अपघाती मृत्यु दाखवून विम्याची रक्कम लाटण्यासाठी करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणी चौघा पोलिसांविरुद्ध खटला (अभियोग) दाखल करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे संबंधीत चौघा पोलिसांच्या गोटात खळबळ माजली आहे. राज्याच्या उपसचिव अर्चना वालझाडे यांनी हे मंजुरीचे आदेश नुकतेच काढले आहेत. रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, सुनील निकम आणि महेंद्र पाटील अशी या प्रकरणातील चौघा पोलिसांची नावे आहेत. त्यावेळी रविंद्र बत्तीसे व सचिन निकम हे मेहुणबारे पोलिस स्टेशनला तर सुनिल निकम हे चाळीसगाव शहर आणि महेंद्र पाटील हे पाचोरा पोलिस स्टेशनला कार्यरत होते.
मालेगाव येथील राजेंद्र शालिंदर जाधव यांचा 23 फेब्रुवारी 2024 रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या नावे काढण्यात आलेल्या पन्नास लाख रुपयांच्या विम्याची रक्कम लाटण्याचा संगनमताने डाव रचण्यात आला होता. या कटात मयत राजेंद्र जाधव यांची पत्नी, भाऊ, विमा एजंट, वैद्यकीय अधिकारी आदींनी संगनमताने या कटात सहभाग घेतल्याचे पडताळणी दरम्यान उघडकीस आले. विमा कंपनीचे अधिकारी पडताळणीसाठी मयताच्या घरी गेले असता त्यावेळी त्यांना मयताच्या फोटोवरील मृत्युची खरी तारीख 23 फेब्रुवारी 2024 आढळून आली. राजेंद्र जाधव यांच्या मृत्युची कागदोपत्री खोटी तारीख 19 एप्रिल 2025 दाखवण्यात आली होती.
या फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झालेल्या चौघा पोलिसांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाला तपासणी अहवाल पाठवला होता. त्या अहवालानुसार या गुन्ह्यात संबंधितांविरुद्ध सक्षम न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.






