जळगाव : एसीबीकडे पोलिस विभागाच्या वाढत असलेल्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी दिला. डीआयजी प्रताप दिघावकर जळगाव भेटीवर आले असता पोलिस अधिका-यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉलमधे दिघावकर यांनी अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गाला विविध माहितीपर सुचना दिल्या. गुन्हेगारांवर वचक कसा ठेवायचा याबाबतीत अधिकारी वर्गाला काही सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
यानंतर दिघावकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितले की नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्याला गुजरात तसेच जळगाव जिल्ह्याला मध्य प्रदेश राज्याची सिमा आहे. या सिमावर्ती भागातून अमली पदार्थाची तस्करी होत असते. ती तस्करी यापुढे होवू नये व ती पुर्णपणे बंद झाली पाहिजे अन्यथा संबधीतांवर कठोर कारवाईचा इशाराच यावेळी बोलतांना दिघावकर यांनी दिला.
डीआयजी प्रताप दिघावकर यांनी यावेळी सर्वांसाठी आपला मोबाईल क्रमांक ९७७३१४९९९९ जाहीर केला. महिलांवरील अत्याचार व कौटुंबिक छळाच्या तक्रारींसाठी पोलीस दलात विविध सेल स्थापन केले असल्याचे त्यांनी सांगितले. महिला दक्षता समित्या आता नव्याने गठीत करण्याचे आदेश पाचही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी बोलतांना दिली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व सचिन गोरे हजर होते.